नाशिक – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत नाशिक जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या राष्ट्रीय लोक अदालतीत नाशिक जिल्ह्यात एकूण ५५ पॅनलवर प्रलंबित ३२ हजार ९७५ तर दाखलपूर्व ८० हजार २६७ इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी चार हजार १५९ प्रलंबित प्रकरणे तर १२ हजार ६६७ इतकी दाखलपूर्व अशी एकूण १६ हजार ८२६ प्रकरणे एकाच दिवशी लोक अदालतीच्या माध्यामातून निकाली निघाली. यातून मोठ्या प्रमाणावर तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

मोटार अपघात प्रकरणात ९ जानेवारी २०२२ मध्ये मोटार सायकल आणि मालमोटार यांच्यातील अपघातात मृत्यू पावलेल्या मोटार सायकलस्वार संतोष जाधव यांच्या वारसांना अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून रुपये ७३ लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली.

पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रुपये ७३ लाख रकमेत तडजोड होवून प्रकरण लोक अदालतीत निकाली काढण्यात आले. नाशिक जिल्हाभरात अशी एकूण २७३ मोटार वाहन अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली. एका मोटार अपघात प्रकरणात १५ जुलै २०२२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर खुळे यांच्या मोटार सायकलीला जीपने दिलेल्या धडकीत ते मयत झले.

या प्रकरणात पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रुपये ४६ लाख ५० हजार रकमेत तडजोड होवून प्रकरण निकाली काढण्यात आले. अजून एका. मोटार अपघात प्रकरणआत ९ सप्टेंबर २०२४ रोजी सागर कासार हे मयत झाले होते. या प्रकरणातही पक्षकारांच्या सहमतीने रुपये ४२ लाख ३० हजार रुपयांत तडजोड होवून प्रकरण निकाली निघाले.

निफाड येथे अपघातात मयत झालेले योगेश शिंदे हे राजस्थानमधील जोधपूर येथे सैन्य दलात कार्यरत होते. वारसांनी प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी केलेल्या दाव्यात समेट होवून लष्करी जवानाच्या कुटुंबियांना रुपये १ कोटी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. अक्षय सुपेकर हे २३ जानेवारी २०२२ रोजी मोटार सायकलीला कारने धडक दिल्याने जखमी झाले. या अपघातात वाहन मालक व लिबर्टी इन्सुरन्स कंपनी यांच्याविरूद्ध केलेल्या दाव्याविषयी लोक अदालतीत तडजोड होवून रुपये ९४ लाखाची भरपाई सुपेकर यांना देण्यात आली.

लोक अदालतीत कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये एकूण ३ हजार १७३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ४० प्रकरणांत वाद मिटून दाम्पत्यांचे वैवाहिक जीवन पूर्ववत झाले.

निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये –

  • १) परक्राम्य संलेख अधिनियम, कलम १३८अंतर्गत ११४१ प्रकरणे,
  • २) मोटार अपघात- २७३ प्रकरणे,
  • ३) कामगार विषयक – सहा प्रकरणे,
  • ४) कौटुंबिक वाद – ४० प्रकरणे,
  • ५) फौजदारी तडजोडपात्र- २२५ प्रकरणे,
  • ६) इतर – १५१४१ प्रकरणे यांचा समावेश आहे.