चांदवड तालुक्यामधील पाटे शिवारामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी शेत गट क्रमांक ७० मधील शेताच्या शेजरी असणाऱ्या नाल्याजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. यापैकी एकजण १३ वर्षांचा तर एक ११ वर्षांचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार संजय तळेकर यांची दोन्ही मुले ओम आणि साहिल बकऱ्या चारण्यासाठी माळरानामध्ये गेले होते. दुपारी बारा ते संध्याकाळपर्यंत हे दोघे नियमतीपणे बकऱ्या चारायला जायचे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे माळरानावर गेले असता त्यांचा नाल्याच्या पाण्यात पडून दुर्देवी अंत झाला. दुपारी चारनंतर स्थानिकांनी आणि घटनास्थळापासून जवळच असणाऱ्या घरातील लोकांनी या दोघांचे मृतदेह नाल्याबाहेर काढले.
चांदवड पोलीस स्थानकाचे निरीक्षक समीर बारावरकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जाऊन घटनास्थळाची पहाणी करुन पंचनामा केला. ओम आणि साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालायात पाठवण्यात आला. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय.
या घटनेची माहिती मच्छिंद्र कासव या पोलीस पाटीलाने चांदवड पोलिस स्टेशनला दिली. यावरून चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आहे. या घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मन्साराम बागुल, पोलीस हवालदार भावलाल हेंबाडे आणि प्रवीण थोरात हे करीत आहेत.