नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपद वगळता उर्वरित सर्व २० जागांवर सत्तारूढ प्रगती पॅनलची धूळदाण उडवत परिवर्तन पॅनलने बाजी मारली. प्रदीर्घ काळानंतर सभासदांनी मविप्रमध्ये सत्तापरिवर्तन घडवले. कार्यकारी मंडळातील प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत परिवर्तनच्या अॅड. नितीन ठाकरे यांनी प्रगती पॅनलच्या प्रमुख, विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांना पराभूत केले. अध्यक्षपदी प्रगतीचे सुनील ढिकले हे एकमेव उमेदवार विजयी झाले. त्यांनी परिवर्तनच्या आमदार माणिक कोकाटे यांचा पराभव केला. उर्वरित सर्व जागांवर प्रगतीच्या विद्यमान संचालकांसह अनेक दिग्गजांना पराभवाचे धनी व्हावे लागले.
मविप्र शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम निकाल मंगळवारी पहाटे अधिकृतपणे जाहीर झाले. कार्यकारी मंडळ आणि तालुका प्रतिनिधींच्या २१ जागांच्या मतमोजणीत प्रारंभीच्या फेऱ्यांत अटीतटीची वाटणारी लढत नंतर पूर्णत: परिवर्तनच्या बाजूने झुकली. काही जागांवर तीन वा चार उमेदवार रिंगणात होते. पण मुख्य लढत नीलिमा पवार, माणिक बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ प्रगती आणि विरोधी अॅड. नितीन ठाकरे, आ. माणिक कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये झाली. सभासदांची नाराजी दूर करण्यासाठी प्रगती पॅनलने बरीच धडपड केली. परंतु, एकतर्फी निकालाने ती व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट झाले.




कार्यकारी मंडळाच्या सहापैकी पाच जागांवर परिवर्तनने विजय मिळवला. केवळ अध्यक्षपदाची एकच जागा डॉ. सुनील ढिकले यांच्या रूपाने प्रगतीला मिळाली. तालुका आणि महिला राखीव सर्व १५ जागांवर परिवर्तनने वर्चस्व प्रस्थापित केले. तालुका प्रतिनिधीपदी इगतपुरी- संदीप गुळवे (५२६२), कळवण-सुरगाणा – रवींद्र देवरे (५१२६), चांदवड – सयाजी गायकवाड (५१३७), नाशिक महापालिका क्षेत्र – लक्ष्मण लांडगे ((५०२३), निफाड – शिवाजी गडाख (५२५१), नांदगाव – अमित बोरसे (५०१८), सटाणा – डॉ. प्रसाद सोनवणे (४९७९), मालेगाव – रमेशचंद्र बच्छाव ((५०६६), येवला – नंदकुमार बनकर (५२६०), सिन्नर – कृष्णा भगत (५१७९), देवळा – विजय पगार (४८८५), नाशिक ग्रामीण -रमेश पिंगळे (४९९५) हे विजयी झाले. महिला सदस्यांच्या दोन जागांवर अनुक्रमे शालन सोनवणे आणि शोभा बोरस्ते हे विजयी झाले.
अनेक दिग्गज पराभूत
निवडणुकीत परिवर्तनने २० जागांवर थेट विजय मिळवला असला तरी अध्यक्षपदाची जागा मात्र त्यांना गमवावी लागली. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करणारे आमदार माणिक कोकाटे हे ३०९ मतांनी पराभूत झाले. सत्तारूढ प्रगती पॅनलचे नेतृत्व करणारे विद्यमान पदाधिकारी नीलिमा पवार आणि माणिक बोरस्ते हे देखील मोठय़ा फरकाने पराभूत झाले. सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत नीलिमा पवार यांचा १२६१ मतांनी तर सभापदीपदाच्या निवडणुकीत माणिक बोरस्ते यांचा ८७० मतांनी पराभव झाला. प्रगती पॅनलने कधीकाळी कट्टर विरोधी असणाऱ्या डॉ. आहेर गटाला आपलेसे केले होते. त्यातून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना उमेदवारी दिली गेली. परंतु, देवळा तालुका सदस्यपदाच्या निवडणुकीत ते सुमारे २०० मतांनी पराभूत झाले. प्रगती पॅनलने अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पत्ता कापून नवीन चेहेरे दिले होते. परंतु, नव्या चेहऱ्यांसह अनेक विद्यमान संचालकांना सभासदांनी घरचा रस्ता दाखविला. यात उपाध्यक्षपदाचे उमेदवार रामदास गायकवाड, उपसभापतीपदाचे डॉ. विलास बच्छाव, चिटणीस पदाचे उमेदवार प्रशांत पाटील आदींचा समावेश आहे.
कार्यकारी मंडळातील विजयी उमेदवार
* अध्यक्ष – डॉ. सुनील ढिकले (४९३७, प्रगती पॅनल)
* उपाध्यक्ष – विश्वास मोरे (४९६८, परिवर्तन)
* सभापती – बाळासाहेब क्षीरसागर (५२२५, परिवर्तन)
* उपसभापती – देवराम मोगल (५०४२, परिवर्तन)
* सरचिटणीस – अॅड. नितीन ठाकरे (५३९६, परिवर्तन)
* चिटणीस – दिलीप दळवी (५१४६, परिवर्तन)