नाशिक – महिला आणि मुलींनी स्वत:कडे अबला म्हणून न पाहता गरज पडल्यास स्वसंरक्षणासाठी सिध्द होणे, हीच आजची गरज आहे. समाज जितक्या वेगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत आहे, त्याच वेगाने महिलांवरील अत्याचारांमध्येही वाढ होत आहे. संकट कधीही सांगून येत नसते. त्यामुळे येणाऱ्या संकटाला तोंड देण्याऐवजी रडत बसणे योग्य नाही.
संकटांचा त्याचवेळी मुकाबला केल्यास महिलांमध्ये आपण स्वत:आपले संरक्षण करु शकतो, याचा आत्मविश्वास निर्माण होतो. हाच संदेश देण्यासाठी आणि मुली, महिलांना स्वसंरक्षणासाठी सदैव तयार राहण्यासाठी काय करता येऊ शकते, याविषयी नाशिक येथे आयोजित ‘ निर्भय कन्या ‘ कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत सरकारच्या गृह मंत्रालय, तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत (माय भारत) आयोजित ‘महाराष्ट्र-दादरा नगर हवेली आणि दमण-दीव आंतरराज्य युवा सांस्कृतिक आदान-प्रदान’ कार्यक्रमात ‘निर्भय कन्या’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात ३७ युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
नाशिक ग्रामीण पोलीसचे (क्विक रिस्पाॅन्स टीम) प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान आणि ‘मार्क मार्शल आर्ट्स’च्या युवा सचिव सानिया खान यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे विशेष आकर्षण: ‘३-एस’ प्रोटोकॉल’ या प्रशिक्षणात पीडिता मानसिकतेतून बाहेर पडून ‘सर्व्हायव्हर’ (विजेता) बनण्यावर भर देण्यात आला. सानिया खान आणि गोल्डन होरायझन स्कूलची विद्यार्थिनी अदिबा खान यांनी स्वसंरक्षणाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी स्कॅन (निरीक्षण), शाउट (ओरडणे) आणि स्ट्राईक (प्रहार करणे) या ‘३-एस’ सूत्राचा सराव करून घेण्यात आला. “स्वसंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक वार करणे नव्हे, तर प्रसंग ओळखून तो टाळण्याची जागरूकता आणि परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास आहे,” असे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद आरिफ खान यांनी सांगितले. “स्वसंरक्षण म्हणजे केवळ अनोळखी व्यक्तीशी लढणे नव्हे, तर ओळखीच्या व्यक्तीने चुकीचे वर्तन केल्यास त्याला ‘नाही’ म्हणण्याचे मानसिक बळ असणे होय,” असे सानिया खान यांनी नमूद केले.
इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अदिबा खान हिने केरळच्या युवकावर ‘होल्ड आणि लॉक’ तंत्राचा वापर करून त्याला लोळवले. ‘मार्क मार्शल आर्ट्स’च्या सानिया खान यांनी विद्यार्थिनींना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे ‘३-एस’ प्रात्यक्षिक दाखवले. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान यांनी दादरा नगर हवेली आणि दमण-दीव येथील युवा प्रतिनिधींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यशाळेचा समारोप “महाराष्ट्र होय के गुजरात… हवे दीकरी नाही डरे ” (महाराष्ट्र असो वा गुजरात… आता मुलगी घाबरणार नाही) आणि “सशक्त नारी, सुरक्षित नारी” या घोषणांनी करण्यात आला. कार्यक्रम समन्वयक सुनील पांजे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
