नाशिक महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन सोमवारी (दि.१७) स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत.
यंदाच्या महापालिका निवडणुकीमुळे चालू वर्षीचे अंदाजपत्रक तयार असून देखील सादर करता आले नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या २० तारखेपर्यंत महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणे अपेक्षित असते. गेल्या आठवड्यात महापालिकेची स्थायी समिती निश्चित होऊन सभापतिपदी भाजपचे शिवाजी गांगुर्डे निवडून आले. स्थायीची समिती गठीत झाल्यानंतर सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यामुळे स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक प्रभारी आयुक्तांना सादर करणे सोपे होणार आहे. १७ एप्रिल रोजी नाशिकचे प्रभारी महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन् स्थायी समितीला सकाळी ११ वाजता अंदाजपत्रक सादर करतील.
या आठवड्यात अर्थसंकल्पासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून महापालिकेचा अर्थसंकल्प तेराशे कोटींच्या आसपास राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. महापालिका प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टी दरात ५ ते १० टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, यावर स्थायी समिती काय निर्णय घेते हे या बैठकीत स्पष्ट होईल. यंदाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टी दरात वाढ होते का, नाशिकच्या विकासासाठी अंदाजपत्रकात कोणकोणत्या बाबींचा समावेश होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.