नाशिक: महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षांची सदस्य संख्या आणि सुधारित गटनोंदणीनुसार तौलानिक संख्याबळाच्या आधारे स्थायी समितीत सदस्य संख्या निश्चित झाली आहे. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापौर निवडणुकीत संधी मिळू न शकलेल्या तसेच सत्ताधारी भाजपच्या अनेक दिग्गजांनी स्थायी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. सदस्य संख्येनुसार पक्षनिहाय तौलानिक बळ प्राप्त झालेले नसल्याने मागील विशेष सभेत स्थायी समिती सदस्य नियुक्तीचा विषय तहकूब ठेवला गेला होता.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापौर, उपमहापौर पदाप्रमाणे स्थायी सभापती पदाला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. १२२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत सोबत घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे.
पक्ष आणि गटाच्या संख्याबळाच्या आधारे स्थायी समितीसह अन्य समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळते. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांना धडपड करावी लागली. ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे तौलानिक संख्याबळ (९.४४) इतके असून त्यांच्या नऊ सदस्यांना स्थायी समितीत संधी मिळणार आहे. शिंदे गटाने मनसेच्या एका नगरसेवकाला बरोबर घेऊन गट नोंदणी केल्याने त्यांचे एकत्रित संख्याबळ २७ वर पोहोचले. ३.५७ तौलानिक बळानुसार स्थायी समितीत त्यांच्या गटाच्या चार सदस्यांना संधी मिळणार आहे. ठाकरे गटाने काँग्रेसच्या तीन नगरसेवकांसमवेत शहर विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या दोन सदस्यांना स्थायीत स्थान मिळेल. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एक अपक्ष यांच्या गटाला तौलानिक संख्याबळानुसार स्थायीत एका सदस्याचा संधी मिळणार आहे.
स्थायी समितीत तौलानिक संख्याबळाच्या आधारे सदस्य नियुक्तीसाठी मागील तहकूब सभेच्या उर्वरित कामकाजासाठी सोमवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. स्थायी सभापतीपदासाठी भाजपतंर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. महापौर निवडणुकीत संधी न मिळालेले आणि पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक या शर्यतीत उतरले आहेत.
