नाशिक – आधीच अत्यल्प भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक हवालदिल झाले असताना अमेरिका-इस्त्रायल यांनी इराणविरुध्द सुरु केलेल्या युध्दामुळे कृषिमाल देशाबाहेर जाणे जवळपास ठप्प झाले आहे. अशा एकापाठोपाठ एक संकटांना कांदा उत्पादक तोंड देत आहेत. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

नाशिकच्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कांदा पिकावर आलेल्या नवीन संकटासंदर्भात निवेदनातून माहिती दिली आहे. सध्या कांदा पिकाला बाजारात अपेक्षित व परवडणारा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेले आहेत. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. कांदा पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी, वीज, वाहतूक इत्यादींवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. सध्या पीक काढणीपर्यंतचा खर्च भागवणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीत कळवण तालुक्यातील कांदा पिकावर नवीन संकट आले आहे. कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात कांदा पिकावर बीजनाशक तणाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. या तणामुळे कांदा पिकाची वाढ खुंटत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतांमध्ये हे तण झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.बीजनाशक तणाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची भीती अधिक तीव्र झाली आहे. तण नियंत्रणासाठी अतिरिक्त फवारण्या व औषधांवर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक ओझ्यात भर टाकत आहे. मात्र उपलव्ध तणनाशके प्रभावी ठरत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद केले आहे.

कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे पथक कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ पाठवून कांदा पिकांची पाहणी प्रत्यक्ष पाहणी करुन शास्त्रीय अहवाल सादर करावा. बीजनाशक तणाच्या नियंत्रणासाठी प्रभावी व प्रमाणित उपाययोजना राज्यस्तरावरून तातडीने जाहीर कराव्यात.बीजतण नाशकाने बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून विशेष आर्थिक मदत व नुकसान भरपाई जाहीर करावी, कांदा पिकाला हमीभाव किंवा बाजार हस्तक्षेप योजनेद्वारे योग्य दर मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा.कृषी विभागामार्फत आवश्यक तणनाशके व इतर इनपुट्स अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावेत. तालुकास्तरावर मार्गदर्शन शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला देण्यात यावा अशा विविध मागण्या आमदार पवार यांनी निवेदनात केल्या आहेत.

कळवण तालुक्यात २४ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात कांदा या प्रमुख पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. पिळकोस गावातील काही हेक्टर क्षेत्रावर बीजनाशक तणाचा प्रादुर्भाव आढळून आला असून तालुक्यातील गावनिहाय माहिती कृषी विभागाकडून संकलित केली जात आहे. त्यानंतर तालुक्यात किती क्षेत्रात प्रादुर्भाव झाला याचा अंदाज येणार आहे. कांदा पिकावर वाढलेल्या बिजनाशक तणाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कृषी विभागाला तात्काळ निर्देश दिले आहेत.