नाशिक : बांग्लादेशातील हिंसाचारामुळे सीमेवर अडकलेल्या कांद्याच्या मालमोटारींना ३२ तासानंतर प्रवेश मिळण्यास सुरुवात झाल्याने तूर्तास निर्यातीतील अडथळे दूर झाले आहेत. बांग्लादेशातील बँकांकडून शाश्वती (बँक गॅरंटी) घेऊन निर्यातदार कांदा पुरवतात. सध्या तेथील बंद असणाऱ्या बँका दोन-तीन दिवसांत सुरू होतील. त्यामुळे कांद्यासह अन्य कृषिमालाची निर्यात सुरळीत होईल, असे भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेने म्हटले आहे. बांग्लादेशातील हिंसाचार व राजकीय अराजकतेची झळ भारतीय, त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कांद्याला बसली. भारत-बांग्लादेश दरम्यानची सीमा बंद झाल्यामुळे कांदा घेऊन निघालेल्या सुमारे ७० ते ८० मालमोटारी अडकल्या होत्या. सीमेवरील स्थिती लक्षात घेत व्यापाऱ्यांनी तूर्तास बांग्लादेशकडे नव्याने माल न पाठवण्याचे ठरवले. सोमवारी दुपारपासून भारत-बांगलादेश दरम्यानची सीमा बंद झाली होती. बांग्लादेश भारतीय कांद्याचा मोठा खरेदीदार आहे. रस्ते मार्गाने कांद्यासह द्राक्ष, टोमॅटो व अन्य कृषिमाल तिथे पाठविला जातो. सीमा बंद झाल्यामुळे निर्यात पूर्णत: थांबली होती. सीमेवर सुमारे ७५ मालमोटारी अडकल्या होत्या. मंगळवारी रात्री म्हणजे ३० ते ३२ तासानंतर सीमा खुली झाली. कागदपत्रांची छाननी करून कांद्याच्या मालमोटारींना प्रवेश मिळाला. रात्रीच ४० मालमोटारींना बांगलादेशमध्ये प्रवेश मिळाला, अशी माहिती भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिली. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर उर्वरित मालमोटारी लवकरच मार्गस्थ होतील, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा.मुसळधार पावसातही नाशिकमध्ये टंचाईचे संकट, ४५७ गाव-पाड्यांना १११ टँकरने पाणी बांग्लादेशमध्ये दैनंदिन साधारणत: ८० मालमोटारी कांदा घेऊन जातात. सणोत्सवाच्या काळात त्यांची संख्या २०० मालमोटारींपर्यंत जाते. सध्या महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के कांदा बांग्लादेशात पाठविला जात आहे. बांग्लादेशात व्यापार करताना निर्यातदार जोखीम पत्करत नाहीत. त्या ठिकाणी माल निर्यात करताना आगाऊ पैसे घेतले जातात. बांगलादेशमधील बँकांकडून ‘बँक गॅरंटी’ घेऊन कांदा पाठविला जातो. सध्या तेथील बँका बंद आहेत. दोन, तीन दिवसात त्यांचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्यातदार ‘थांबा व प्रतिक्षा करा’ या भूमिकेत आहेत. बँकांचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर कांदा निर्यात पूर्ववत होईल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.नाशिक : जायकवाडीच्या अल्प जलसाठ्याची नाशिक, नगरला चिंता; धरण ६५ टक्के न भरल्यास पाणी सोडण्याची वेळ दरावर परिणाम नाही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निर्यातीसाठी एखाद्या देशावर अवलंबून राहणे हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क हे अडथळे प्रथम दूर करण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बांगलादेशातील घडामोडींचा स्थानिक दरावर परिणाम होण्याची फारशी शक्यता नसल्याचे मत लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केले. लासलगाव बाजार समितीत बुधवारी पहिल्या सत्रात कांद्याला सरासरी २९७० रुपये दर मिळाला. आदल्या दिवशी हाच दर २९०० रुपये होता.