नाशिक – युद्धामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेत कांद्याचा परदेशातील प्रवास अवघड झाला असताना दुसरीकडे रेल्वेद्वारे देशांतर्गत बाजारपेठेत पोहोचण्यात त्यास कालापव्यय होत आहे. नाशिकमधून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात रेल्वेद्वारे कांदा पाठविला जातो. वाहतुकीला विलंब होत असल्याने तुर्तास व्यापारी हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रशासन पुरेसे रेक उपलब्ध करीत नाही. वाटप केलेले रेक दोन, तीन दिवस एकाच ठिकाणी उभे राहतात, ज्यामुळे वाहतुकीला विलंब होत असल्याची तक्रार लासलगाव बाजार समितीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

इराण आणि इस्त्रायल, अमेरिका संघर्षामुळे आखाती देशातील भारतीय कांद्याची निर्यात विस्कळीत झाली असून शेकडो कंटेनर मुंबईच्या न्हावा शेवा अर्थात जवाहरलाल नेहरू बंदरावर अडकले आहेत. निर्यात थंडावल्याने दरावर परिणाम होत आहे. बाजारभाव घसरत असल्याने शेतकरी वर्गातील असंतोष आंदोलनातून व्यक्त होत आहे. लासलगाव बाजार समितीने घसरत्या दराबाबत व्यापारी घटकांशी चर्चा केली असता रेल्वेशी संबंधित अडचणी समोर आल्या. स्थानिक पातळीवर खरेदी केलेला कांदा बाहेरील बाजारपेठेत पाठविण्यासाठी व्यापारी प्रामुख्याने रेल्वेवर अवलंबून असतात. तथापि, सध्या पुरेसे रेक उपलब्ध करून दिले जात नाहीत. रेल्वे कर्मचारी आणि लोकोमोटिव्ह चालकांची कमतरता असल्याने वाटप केलेले रेक दोन ते तीन दिवस जागेवरून हलत नाही. वाहतुकीस विलंब होतो, याकडे बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप यांनी लक्ष वेधले.

खरीप अर्थात लाल कांदा नाशवंत कृषी उत्पादन आहे. तो जास्त काळ साठवता येत नाही. रेक हलवण्यास विलंब झाल्यास त्याची गुणवत्ता खराब होते. कोंब फुटतात, वजन कमी होते. व्यापाऱ्यांचे नुकसान होते. बाजारभाव घसरल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो. या पार्श्वभूमीवर, लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातून कांदा वाहतुकीसाठी रेल्वे रेक प्राधान्याने व पुरेशा संख्येने वाटप केले जाऊ शकते. वाटप केलेल्या रेकची वेळेवर वाहतूक निश्चित करण्यासाठी पुरेसे चालक, कर्मचारी तैनात करावे. कांदा नाशवंत असल्याने वाहतुकीत त्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी सभापती डी. के. जगताप यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

संथ वाहतूक आणि तापमानातील वाढ

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि बनारस, बिहारमधील पाटणा, आसाममध्ये गुवाहाटी, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आदींसह देशातील प्रमुख बाजारपेठेत रेल्वेद्वारे पाठविला जातो. एकतर रेक उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाले तर, माल भरण्यासाठी मजूर नाही. रेल्वेने माल कधी पोहोचेल, याची शाश्वती नसल्याने व्यापारी या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला तयार नाही. वाढत्या तापमानात कांदा घेऊन जाणाऱ्या मालवाहू रेल्वेला विलंब झाल्यास प्रतवारी खराब होण्याचा धोका असतो, असे कांदा व्यापारी मनोज जैन यांनी सांगितले. दिल्लीतील बाजारात गुणवत्तापूर्ण माल लागतो. रेल्वेतून माल कधी जाईल, याचा नेम नाही. त्यामुळे काही व्यापारी मालमोटारीने दिल्लीला माल पाठवत असल्याचे सांगितले जाते.