नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या खर्चात तब्बल ५७ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. सुरुवातीला विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामांसाठी ५७२.५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. वेगवेगळ्या कारणांमुळे आता या प्रकल्पाचा खर्च ६२९.४१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभपर्वाची ध्वजारोहणाने नुकतीच सुरुवात झाली. पुढील वर्षी, म्हणजे २०२७ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान अमृतस्नान होणार आहे. कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी पायाभूत सुविधांची व्यापक कामे हाती घेतली आहेत. त्यातील एक म्हणजे नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) प्रस्तावानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने ५७२.५१ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिली होती. एमएसआयडीसीने निविदा स्वीकृत केल्यानंतर कामांची अंतिम रक्कम ५९८.४४ कोटी रुपयांवर गेली. त्यामुळे मूळ प्रशासकीय मान्यतेच्या रकमेत २५.९३ कोटी रुपयांची वाढ झाली.
सुरक्षा व अन्य निकषांमुळे कामात वाढ
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्यूरो (बीसीएएस) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सुरक्षा व अन्य नियमांनुसार काही आवश्यक उपकरणे आणि कामांमध्ये वाढ करावी लागली, असे एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अतिरिक्त बाबींचा समावेश झाल्यामुळे खर्चात आणखी ३०.९७ कोटी रुपयांची वाढ झाली. अशा प्रकारे विमानतळाच्या कामांसाठी ५६.९० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची आवश्यकता कुंभमेळा प्राधिकरणासमोर मांडण्यात आली.
मानकांच्या पूर्ततेसाठी…
विमानतळाचे काम पायाभूत सुविधा समितीसमोर सादर करण्यात आले, तेव्हा अतिरिक्त निधीची आवश्यकता भासणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कामाची निकड आणि बीसीएएस व डीजीसीएची मान्यता मिळविण्यासाठी मानकांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त निधीची मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार कुंभमेळा प्राधिकरणाने ६२९.४१ कोटी रुपयांच्या कामांना (५६.९० कोटी रुपयांच्या वाढीसह) सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती प्राधिकरणातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
काम ४० टक्क्यांवर
विमानतळाच्या नवीन इमारतीची रचना श्रीरामांच्या धनुष्याच्या आकाराची असणार आहे. विस्तारीकरणांतर्गत १८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची अतिरिक्त टर्मिनल इमारत आणि १ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळाची अतिरिक्त उपयोगिता इमारत उभारण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत ४० टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च-एप्रिलपूर्वी विमानतळाचे काम पूर्ण करण्याची तयारी करण्यात आल्याचे एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
