नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळास ‘कुसुमाग्रज नगरी’ असे नाव देण्यात येणार असून प्रवेशद्वारावर ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसमाग्रज यांची चित्रकृती लावण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात नाशिकचे प्रतिबिंब दिसावे यासाठी संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्र-शिल्प कलांचा समावेश करण्यात आला आहे.

येथील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात साहित्य संमेलन भरत असून यानिमित्ताने पहिल्यांदाच साहित्याच्या प्रांतात कलेला स्थान देण्यात आले आहे. शहरातील चित्रकार, शिल्पकार एकत्र आले आहेत. ज्येष्ठ चित्रकार मुक्ता बालिगा, आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत यांसह १०० हून अधिक कलाकार एकत्र येऊन वेगवेगळय़ा संकल्पनांवर काम करत आहेत.  संमेलन स्थळावर भरविण्यात येणाऱ्या चित्र प्रदर्शन, शिल्प प्रदर्शन स्थळांना अनुक्रमे वा. गो. कुलकर्णी, शिवाजी तुपे यांची नावे देण्यात आली आहेत. संमेलनाचे वेगळेपण म्हणजे प्रवेशद्वारावर ६० ते ७० फुट लांब तसेच २० फुट उंच अशी कुसुमाग्रजांची चित्रकृती तयार करण्यात येणार असल्याचे चित्रकार राजेश सावंत यांनी सांगितले.

संमेलनाच्या प्रवेशद्वारापासून संमेलन स्थळापर्यंत पोहोचत असतांना नाशिकचा धावता परिचय देण्यासाठी वेगवेगळय़ा निसर्गचित्रांची मांडणी करण्यात येणार आहे. यामध्ये गोदाकाठ, पंचवटी परिसर, त्र्यंबकेश्वरसह अन्य भागातील चित्रे लावण्यात येणार आहेत.

याशिवाय शहरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांनाही स्थान देण्यात येणार आहे. समकालीन ज्येष्ठ चित्रकारांची चित्रे या ठिकाणी असतील. या प्रदर्शनात सेल्फी पॉईंटही करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर कुसुमाग्रजांची चित्रकृती चित्र, शिल्पकला आणि सुलेखनाचे प्रात्यक्षिक संमेलनस्थळी वेगवेगळय़ा सत्रात पाच चित्रकार, पाच शिल्पकार, पाच नखाने चित्र काढणारे, सुलेखनकारसह वारली अशा कलाप्रकारातील कलाकार एकत्र येऊन त्यांच्या चित्रकृतींचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले संमेलनाचे संचित जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

धोकादायक प्रवास राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहनातून धोकादायकपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. सध्या नाशिक परिसरातील महामार्गावर असेच चित्र पाहायला मिळत आहे.