नाशिक – पंचवटीतील हिरावाडी येथील न्यु समृध्दी ज्वेलर्स या सराफी पेढीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन मुख्य संशयितांना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने पंजाबमधून शिताफीने अटक केली. या अटकेमुळे परप्रांतीय गुन्हेगारांची नाशिकमधील गुन्ह्यांशी असलेली साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. दुकानचालक नैना पगारिया यांच्या धाडसी प्रतिकारामुळे दरोडेखोरांचा दुकान लुटण्याचा बेत उधळला गेला. हाती लागलेल्या दागिन्यांच्या काही पेट्या घेऊन त्यांना पळावे लागले होते. दरोड्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरोड्यामुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया उमटली होती.
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची उकल कशी केली, याबाबत माहिती दिली. न्यु समृध्दी ज्वेलर्सवर दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. त्यातून संशयित परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली. नाशिक, पंचवटी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ५०० हून अधिक सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी केली. त्यानुसार संशयितांचा माग काढण्यात आला.
संशयित पंजाब येथील असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पंजाबमधील मोहाली गाठले. मोहालीत सलग तीन दिवस तपास करण्यात आला. पोलिसांनी हनिषकुमार महेंद्रसिंग (४७, रा. डेराबस्सी), रणजितसिंग दर्शनसिंग (५२, रा. बहादरपूर) यांना ताब्यात घेतले. दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हेगारांनी पंजाबमधून मुंबई येथे आल्यावर नाशिक गाठले. नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी हिरावाडी परिसराची पाहणी करुन न्यु समृध्दी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचे निश्चित केले. यासाठी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरल्या. नियोजनाप्रमाणे ते दुकानात शिरलेही. परंतु, दुकानदार नैना पगारिया यांनी कडवा विरोध केल्याने त्यांचा दरोड्याचा बेत फसला. संशयितांना पळून जावे लागले. विशेष म्हणजे संशयितांनी आपले भ्रमणध्वनी नाशिक गाठण्यापूर्वी बंद केले असतांना त्यांची ओळख पटवणे, शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र नाशिक पोलिसांनी हे आव्हान पेलले.
काय आहे प्रकरण?
नाशिक येथे हिरावाडी परिसरातील न्यु समृध्दी ज्वेलर्स येथे १५ मे रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास दुचाकींवर आलेल्या ६ अज्ञात आरोपींनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता. या मध्ये दुकान मालकाकडून होणारा विरोध पाहता हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र दरोडेखोरांच्या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला. जखमी कर्मचाऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
