नाशिक – गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ सुधारीत २००३ कायद्याचा प्रचार, प्रसिद्धी प्रभावीपणे करण्यासह तीन वर्षात ज्या तालुक्यांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण घटले, अशा ठिकाणी लिंग गुणोत्तर प्रमाण वाढीकरिता प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय देवकर, मालेगाव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे आदींसह सर्व वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुलीच्या जन्माचा दर कमी होत आहे. याबाबत बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी चिंता व्यक्त केली. काही तालुक्यात तीन वर्षांत लिंग गुणोत्तर कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब चिंताजनक असून लिंग गुणोत्तर घटण्याची नेमकी कारणे शोधणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचा सहभाग राहणार आहे.

प्रमाण कमी का झाले, याचा सखोल अभ्यास करुन त्याची कारणे देण्याची सूचना शर्मा यांनी केलीआहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायद्यानुसार जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची काटेकोर तपासणी केली जावी, केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले लाभ त्वरीत प्रदान करण्यात यावेत, यासह प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आभा कार्डसाठी प्रत्येक व्यक्तीची नोंदणी होणे अत्यावश्यक असून यातून जिल्ह्यातील एकही व्यक्ती सुटता कामा नये याबाबतचे नियोजन करावे.

नोंदणीसाठी ग्रामीण भागासह शहरातही विशेष शिबीरआयोजित करून नागरिकांची नोंदणी करण्यास गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अंगणवाडी, शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प यांनी विशेष मोहीम हाती घेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कसे वाढेल यावर काम करावे, यासाठी कोणते उपक्रम हाती घेता येतील, याविषयी चर्चा करण्यात आली.