नाशिक – नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पातळीवरून रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृक्षतोडीशी संबंधित कामे सध्या थांबवून, इतर कामे सुरू आहेत. वृक्षतोड होत असेल तर झाडे लावणे बंधनकारक करता येईल. हा जगाचा कुंभमेळा असल्याने पर्यावरणाचा विचार करून योग्य निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी देश- विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतील. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासह स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी मुंडे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंडे यांनी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन संदर्भात अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या, त्याची माहिती घेतली असून आवश्यक सूचना करण्यात आल्याचे सांगितले. गोदा प्रदुषणासह औद्योगिक प्रदुषण रोखण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. नदी प्रदूषणबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक पुढे येत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
गोदावरी, नंदिनीसह विविध नद्या स्वच्छ, प्रदूषणरहित आणि बारमाही प्रवाहित राहतील याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारे सांडपाणी थेट नदीपात्रात जाणार नाही, हे पाहावे लागणार आहे. मलनि:स्सारण, जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. प्रकल्पांची क्षमता वाढवितानाच तंत्रज्ञानाचाही वापर करावा, शुद्ध केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराचेही नियोजन करावे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढवावा. भाविकांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेचे तसेच कुंभमेळा कालावधीत घनकचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. यासाठी पर्यावरण विभागातर्फे आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नदी स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
