धुळे : नाशिकमध्ये विकसित होत असलेला ‘नाशिक परिक्रमा मार्ग’ आणि रिंगरोड हे प्रकल्प केवळ नाशिक शहरापुरते मर्यादित न राहता खान्देशातील विशेषतः धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसाठी मोठी दिलासादायक पर्वणी ठरणार आहेत. २०२६–२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून, लाखो भाविकांच्या प्रवासात आमूलाग्र बदल घडवणारे ठरतील असा दावा सूत्रांनी यावेळी केला.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून येणारे भाविक प्रामुख्याने मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून (एनएच-३) नाशिकमध्ये प्रवेश करतात. सध्या शहरात प्रवेश केल्यानंतर द्वारका, सीबीएस, पंचवटी व त्र्यंबकेश्वर मार्गावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे भाविकांना तासंतास अडकून राहावे लागते. मात्र, नव्या रिंगरोड व परिक्रमा मार्गामुळे खांदेशातील भाविकांना नाशिक शहरात न शिरता थेट त्र्यंबकेश्वर, पंचवटी किंवा इतर तीर्थक्षेत्रांकडे जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ किमान ४५ मिनिटांपासून ते एक तासापर्यंत कमी होणार आहे.

धुळे–नंदुरबार पट्ट्यातील भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येतात. ६६.१ किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्ग आणि प्रस्तावित रिंगरोड एकमेकांना जोडलेले असल्याने, धुळ्याकडून येणारी वाहने बाहेरच्या बाहेरूनच त्र्यंबक रोडला जोडली जाऊ शकतील. विशेषतः कुंभमेळ्याच्या काळात, जेव्हा शहरातील अनेक मुख्य रस्ते भाविकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवले जातात, तेव्हा हा रिंगरोड खांदेशातून येणाऱ्या वाहनांसाठी ‘लाईफलाईन’ ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीवर उभारण्यात येणारे दोन नवे पूलही खान्देशातील भाविकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत यासाठी ११६ कोटी रुपयांची निविदा (टेंडर) काढण्यात आले आहे. या पुलांमुळे भाविकांना गोदावरी नदी ओलांडून तपोवन, जनार्दन स्वामी मठ, पंचवटीसारख्या पवित्र स्थळांकडे जाणे अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नाशिकला येतात. रिंगरोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था उभारणे प्रशासनाला शक्य होणार असून, तेथून भाविक पायी किंवा बसद्वारे परिक्रमा मार्गाचा वापर करून थेट स्नान घाटांपर्यंत पोहोचू शकतील. यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा फायदा केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित न राहता वर्षभर राहणार आहे. खांदेशातील भाविक नियमितपणे नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंचवटी येथे देवदर्शनासाठी येतात. सुधारित रस्ते, जलद कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त प्रवासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून त्याचा लाभ नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

धुळे मार्गावरून (एनएच-३) येणाऱ्या वाहनांसाठी आडगाव आणि विल्होळी ही दोन प्रमुख जोडणी ठिकाणे ठरणार आहेत. आडगाव नाका किंवा आडगाव ट्रक टर्मिनस परिसरात रिंगरोड व परिक्रमा मार्गाची सुरुवात व शेवट होणार असल्याने धुळ्याहून येणाऱ्या भाविकांना येथेच रिंगरोडवर प्रवेश मिळेल. तसेच विल्होळी परिसरात हा रिंगरोड पुन्हा मुंबई-आग्रा महामार्गाला जोडला जाणार आहे. या जोडणीमुळे खान्देशातल्या भाविकांना नाशिकमधील सिग्नल, वाहतूक कोंडी व गर्दी टाळून थेट आपल्या इच्छित तीर्थस्थळी पोहोचता येणार आहे.

एकूणच, संपूर्ण नाशिक परिक्रमा मार्ग आणि थेट कुंभ मेळ्यापर्यंत रिंगरोड होणार नसला, तरी हे दोन्ही प्रकल्प खान्देशातील भाविकांसाठी प्रवास सुलभ, सुरक्षित आणि वेळेची मोठी बचत करणारे ठरणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनातही त्यांची निर्णायक भूमिका राहणार आहे.