नाशिक : वर्ष संपत आले की सर्व निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात स्वत: उपस्थित राहणे म्हणजे एक कठीण समस्या वाटते. कारण, बहुसंख्य निवृत्तीवेतनधारकांचे वय सत्तरीच्यापुढे गेलेले असते. गुडघेदुखीसाठी आरोग्याच्या अनेक समस्या पाठीशी लागलेल्या असतात. तरीही हयातीचा दाखला सादर करण्यासाठी त्यांना कोषागार कार्यालयात जाणे भाग होते. परंतु, आता नाशिक जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करता यावा, यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता घरबसल्या डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये जीवन प्रमाण पोर्टल (Jeevan Pramaan Portal) या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून https://jeevanpramaan.gov.in⁠ येथे डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येईल. तसेच मोबाईल ॲपद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यासाठी Jeevan Pramaan Face App आणि Aadhaar Face RD या ॲपच्या सहाय्याने स्मार्टफोनद्वारे चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) करून हयातीचा दाखला सादर करता येईल.

डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आवश्यक बाबी – आवश्यक कागदपत्रे व माहिती – आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, PPO क्रमांक तसेच आवश्यक निवृत्तीवेतनविषयक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.

चेहरा प्रमाणीकरण

Jeevan Pramaan Face App व Aadhaar Face RD ॲपच्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण करून डिजिटल दाखला सादर करता येईल. दाखल्याची पावती : प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर डिजिटल हयातीचा दाखला तयार होतो. त्याचा Pramaan ID प्राप्त होतो. हा आयडी भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावा. नाशिक जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी २ ते ३० नोव्हेंबर २०२६ या विशेष अभियान कालावधीत डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे. डिजिटल हयातीचा दाखला सादर करताना काही अडचण उद्भवल्यास संबंधित बँक शाखा अथवा कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.