नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी शाही पर्वणी उत्साहात पार पडल्यानंतर साधू-महंतांनी लगेचच साहित्याची आवरासावर केली असली तरी पोलीस यंत्रणेच्या पातळीवर अद्याप काहिशी शांतता असल्याचे लक्षात येते. यामुळे सिंहस्थात स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या लोखंडी जाळ्या अजुनही ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. साधुग्राममधील पाण्याच्या टाक्या आणि कचरा पेटी हलविण्याचे काम सुरू झाले. पण, या परिसराची स्वच्छता करण्याचा पालिकेला विसर पडला. सिंहस्थात हजारो सफाई कामगारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे बिगूल फुंकणाऱ्या पालिकेचा उत्साह ओसरल्याचे दिसत आहे.
आखाडय़ाची आवरासावर जवळपास पूर्ण झाली असताना प्रशासनानेही भुरटय़ा चोऱ्यांवर नियंत्रण रहावे, यासाठी साधुग्राम परिसरात उपलब्ध केलेली साधनसामुग्री ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. अपवाद आहे, तो केवळ लोखंडी जाळ्यांचा. पोलीस यंत्रणेला त्यांचा बहुदा विसर पडला असून गोदा काठांसह साधुग्राम व परिसरातील रस्त्यांवरील या जाळ्या आजही वाहनधारकांसाठी अडसर ठरत आहे. खरेतर नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रशासनासह विविध विभाग युध्द पातळीवर प्रयत्नशील राहिले. दुसरीकडे, साधू-महंतांना कोणत्याही सोयी-सुविधांची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने भूखंडासह शौचालय, कचरा कुंडी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, विद्युत पुरवठा आदी सामुग्री पुरविण्यात आली होती. या ठिकाणी प्रत्येक आखाडय़ाने अलिशान शामियाने उभारले. काहिंनी राजेशाही थाटात व्यवस्था केली. १८ सप्टेंबर रोजी नाशिकचे अखेरचे शाही स्नान झाल्यानंतर बहुतांश साधू-महंतांनी आपल्या मूळ गावी कूच करणे पसंत केले. तत्पुर्वी, आखाडय़ांनी आपले साहित्य रवाना केले. शामियाने उतरविले. दिगंबर आखाडय़ाने तर ध्वजावतरणही केले. काही खालसे त्र्यंबक येथील शैव पंथीयांच्या अखेरच्या स्नानासाठी थांबले होते. २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबक येथील स्नानानंतर त्यांनी देखील आपला पसारा आवरण्यास सुरूवात केली आहे.
आखाडे आणि खालसे यांचे मंडप उतरल्याने अवघ्या अकरा दिवसात साधुग्राम सुनेसुने झाले आहे. संबंधितांनी आपले साहित्य वेगवेगळ्या वाहनांमधून मूळ गावी रवाना केले. सध्या अतिशय तुरळक प्रमाणात साधू या ठिकाणी आहेत. साधुग्राममधील शुकशुकाट लक्षात घेऊन पालिकेने या ठिकाणी पुरविलेले साहित्य ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो टाक्या, एक हजाराहून अधिक प्लास्टिक कचरा कुंडी आदी साहित्य पालिकेने दिले होते. हे साहित्य हलविण्यास सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना साधुग्रामधील कचऱ्याकडे मात्र पालिकेचे लक्ष नाही. शहरवासीयांच्या आरोग्याच्यादृष्टीने मोकळ्या होणाऱ्या या परिसराची स्वच्छता तितकीच गरजेची आहे, याकडे स्थानिक लक्ष वेधत आहेत.
या गदारोळात ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या दृष्टीपथास पडतात. सुरक्षितता व गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोखंडी जाळ्या मागविण्यात आल्या होत्या. या जाळ्यांमुळे पहिल्या पर्वणीला शहरवासीयांना स्थानबध्द झाल्याची अनुभूती घ्यावी लागली होती. पुढील पर्वण्यांमुळे लोखंडी जाळ्यांचे प्रमाण काहिसे कमी करण्यात आले. आता सिंहस्थातील प्रमुख शाही पर्वण्या संपुष्टात येऊनही लोखंडी जाळ्यांचे अस्तित्व सर्वत्र अधोरेखीत होते. काही लोखंडी जाळ्या थेट नदीपात्रात पडल्या आहेत. अनेक चौकात त्या अस्ताव्यस्त उभ्या असल्याचे दिसते. काही ठिकाणी जाळ्यांचा वापर धुतलेले कपडे वाळत टाकण्यासाठी केला जात असल्याचे पहावयास मिळते. सिंहस्थानंतर राज्यातील इतर शहरातील पोलिसांना या जाळ्या देण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यादृष्टीने काही हालचाल होत असल्याचे दिसत नाही. सिंहस्थ बंदोबस्तासाठीच्या या जाळ्या त्याच ठिकाणी असल्याचे दिसून येते. रस्त्यांवरील या जाळ्या वाहतुकीला अडसर ठरत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.