नाशिक – कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात चाललेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मंगळवारी ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’च्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांना भेटता आले नाही. मोर्चेकरी धडकले असता महापौर मुख्यालयात उपस्थित नव्हत्या.
उपमहापौर अन्य कामात व्यस्त होते. बरीच प्रतिक्षा केल्यावर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपमहापौरांच्या स्वीय सहायकांकडे सोपविले. लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आणि टाळाटाळ ही नागरिकांच्या प्रश्नांबाबतची असंवेदनशीलता दर्शविणारी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
डोंगर फोड, नदीचा बिमोड आणि बेसुमार वृक्षतोड यांसारख्या विनाशकारी विकास धोरणांविरोधात ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’च्या वतीने बी.वाय.के. महाविद्यालय सिग्नल चौक ते राजीव गांधी भवन या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात काही जण ऑक्सिजनचा मुखवटा घालून सर्जनशील व उपरोधिक फलक घेऊन सहभागी झाले होते. हरित कुंभच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षमुक्तीच्या धोरणाचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चानंतर शिष्ट मंडळाने महापौरांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र महापौर अनुपस्थित होत्या. त्यानंतर उपमहापौर प्रतिनिधींशी चर्चा करतील, असे सांगण्यात आले, परंतु ३० ते ४० मिनिटे प्रतिक्षा करूनही कोणताही लोकप्रतिनिधी भेटीस आला नाही. या निषेधार्थ शिष्टमंडळाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना न भेटण्याचा निर्णय घेतला. आणि निवेदन उपमहापौरांच्या स्वीय सहायकाकडे सुपूर्द केले. लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
हरित लवादाने २८ एप्रिलपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती देत नागरिकांच्या संघर्षाला न्याय दिला आहे, तरीही प्रशासनाची भूमिका बदललेली दिसत नसल्याचे टिकास्त्र सोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून फायकस प्रजातीतील वड, पिंपळ, औदुंबर यांसारख्या वृक्षांच परवानगीशिवाय तोड करण्यात आली, हा न्यायालयाचा अवमान असून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आनंद रॉय, मानसी सरदेसाई, अदिती पटेल, दीप्ती बर्वे, डॉ कविता देवरे, जिज्ञासा जाधव, मुक्ता कावळे यांच्यासह अनेक युवा नाशिककर उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले, जिल्हा सचिव मनोहर पगारे, माकपचे डॉ. डी. एल. कराड, राहुल गायकवाड हेही उपस्थित होते.
पाच हजार जणांची स्वाक्षरी
नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी १० एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत पाच हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. या स्वाक्षरी महापौर, मुख्यमंत्री, हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
