नाशिक – नाशिक जिल्ह्यातील काही अवघड घाटांपैकी एक असलेल्या नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात एक विचित्र अपघात झाला. भरधाव मालट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने मालट्रकची मारुती इको कारला पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, इको कार समोरील दुसऱ्या मालट्रकखाली दाबली गेली. दोन्ही मालट्रकामध्ये इको कार चिरडली गेल्याने या भयानक अपघातातत इको कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नाशिक -पेठ रस्त्यावरील सावळघाटात कायमच वाहतूक कोंडी, अपघात असे प्रकार होत असतात. हा घाट वाहन चालकांच्या कौशल्याची परीक्षा पाहणारा मानला जातो. घाटातील काही वळणे धोकादायक आहेत. नवीन चालकांना या घाटात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. रविवारी सायंकाळी नाशिककडून पेठच्या दिशेने मारुती इको कार जात असताना ती सावळघाटात आली. घाटातील तीव्र उतारावर कार असताना पाठीमागून येणाऱ्या एका मालट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटला. मालट्रक अनियंत्रित होऊन मालट्रकने समोरील इको कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

घाटात तीव्र उतार असल्याने आणि धडक जोरात बसल्याने इको कार पुढे चाललेल्या दुसऱ्या मोठ्या ट्रकच्या मागील बाजूस वेगाने जाऊन धडकली दोन अवजड ट्रकमध्ये इको कार अक्षरश: चिरडली गेली. इको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील राजोयाभाई तुमडा (५५), अनुभाई वळवी (३०), रमणभाई चिमण्या (४९) आणि धर्माबाई जेमेनिया (४०) यांचा मृत्यू झाला. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात गंभीर जखमी खालपाभाई गोकुळ यांना दाखल करण्यातआले आहे. हे सर्वजण गुजरातमधून सप्तश्रृंग देवीचे दर्शन घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आले होते. देवीचे दर्शन घेऊन आनंदात ते गुजरातकडे परतत असताना त्यांच्या इको कारला अपघात झाला.

सावळघाटात झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कारचे पत्रे कापावे लागले. मृतदेह पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या भीषण अपघातामुळे सावळघाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला सारून घाटातील वाहतूक पूर्ववत केली. सावळघाट हा तीव्र उतार आणि चढीचा असल्याने पोलिसांकडून वाहन चालकांना कायमच या घाटातून जाताना सावधगिरीने वाहने चालविण्याची सूचना केली जाते. परंतु, अनेक वेळा वाहन चालकांकडून भरधाव जाण्याच्या नादात सूचनांकडे दुर्लक्ष होऊन अपघात होतात.