नाशिक – पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले. या कारवाईने ५८ गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयितांकडून १० गुन्ह्यांतील सुमारे ३० लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे हे अटक नाट्य एखाद्या सिनेमातील कथानकाला मागे टाकेल इतके नाट्यमय आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत संशयितांना जेरबंद केले.
मागील काही वर्षात पोलीस असल्याची बतावणी करत शहर तसेच ग्रामीण भागात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वृध्दांना, महिलांना लुटण्यात येत होते. काही वेळा घरात घुसून चोरी करण्यात आली आहे. नाशिक परिमंडळ दोन अंतर्गत असे गुन्ह्यांचे काही प्रकार समोर आले. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी काही सूचना केल्या.
अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपुत यांनी अंबड पोलीस गुन्हे शोध पथकाला याबाबत माहिती दिली. गुन्हे शोध पथक नियमीत गस्त घालत असतांना पोलीस अंमलदार मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित इसम फिरतांना दिसले. त्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू करत पोलीस निरीक्षक राजपुत यांना याबाबत माहिती दिली.
राजपुत यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सुचना देऊन अतिरिक्त मनुष्यबळ पाठवले. संशयितांना पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने पळ काढला. पोलीस पथकातील सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस अंमलदार मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे आदींनी ३० किलोमीटर पाठलाग करत ओझर येथील उड्डाण पुलावर दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट झाली.
चौकशीत केली असता संशयितांची नावे अमजदअली अकबरअली बेग (४७,भिवंडी) फैय्याज इम्तियाज अन्सारी (२८, भिवंडी) असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयितांनी पोलीस असल्याची बतावणी करत चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईतून २०२३ पासुन आतापर्यंत त्यांनी केलेले ५८ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यामध्ये नाशिक शहरात ४२, नाशिक ग्रामीण १०, धुळे शहर पाच व कर्नाटकमधील एका गुन्ह्याचा समावेश आहे.
संशयितांकडून आतापर्यंत १० गुन्ह्यांतील सुमारे २०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. संशयितांवर कर्नाटक येथील बेटगेरी पोलीस ठाण्यातील पोलीसांववर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. संशयितांच्या अन्य साथीदारांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी अंबड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगितले. यातून पोलीस बतावणीचे ५८ गुन्हे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पोलीस अंमलदार मयूर पवार हे मागील दोन वर्षांपासून या गुन्हेगारांचा अभ्यास करत होते. त्यांची देहबोली, कपडे तसेच वाहनांच्या माध्यमातून संशयितांना पकडण्यात यश आल्याचे कर्णिक यांनी नमूद केले.

