नाशिक – काही महिन्यांपूर्वी शहरातील ढासळणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेवरुन नाशिक पोलीस टिकेचे धनी झाले होते. गुंड पोलिसांना जुमानेसे झाले होते. ‘नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ असे फलक काही समाजकंटकांनी लावत, रिल्स तयार करुन पोलिसांना डिवचले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नाशिक शहर पोलिसांनी संबंधित गुंडांना वठणीवर आणत त्यांच्याकडून‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे वदवून घेतले.

त्यानंतर तशी पध्दतच सुरु झाली. पोलिसांच्या या मोहिमेच्या धसक्याने काही सराईत गुन्हेगार फरार झाले. नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे ठिकठिकाणी फलकांव्दारे स्वागतही केले. परंतु, आता पोलिसांच्या या कार्यपध्दतीवरच वाद उभा राहिला आहे. पोलिसांना अशा प्रकारच्या गुंडांच्या चित्रफिती समाज माध्यमात टाकण्याचा हक्क आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मागील वर्षात गुन्हेगारीचा आलेख चांगलाच उंचावला होता. सोनसाखळी चोरी, लुटमार, वाहनचोरी, कोयते आणि तलवारींनी हल्ले, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक असे प्रकार नेहमीचे झाले होते. राजकीय आश्रय लाभलेल्या काही गुंडाकडून दहशत पसरविण्यात येत होती. गुंडगिरी थांबविण्यासाठी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली होती.

या स्थितीत काही समाजकंटकांनी नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशी चित्रफित प्रसारित केली. या चित्रफितीतील सूत्रधारास पोलिसांनी आपला खाक्या दाखवित त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, त्याची दोन्ही मुलगे, मामा राजवाडे अशा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांविरुध्दही तीच पध्दत अवलंबिण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात गुन्हेगाराला आणायचे, त्याला न्यायालयात नेण्यासाठी काही अंतरावर उभ्या केलेल्या वाहनापर्यंत नेतांना त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेणे, असा हा एकूण प्रकार. याचा धसका घेत अनेक गुन्हेगार फरार झाले. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत झाले. राज्यात इतरत्रही काही ठिकाणी त्याचे पोलिसांकडून अनुकरण करण्यात आले.

आता या उपक्रमाविषयी वाद उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात ॲड. यतिन पंडित यांनी उपक्रमाचे स्वागत करतानाच आणि गुन्हेगारांवर वचक बसल्याचे मान्य करतानाच दुसरी बाजू मांडली. सर्वच गुन्हेगार नसतात. काही परिस्थितीमुळे फसलेल्यांचीही अशा उपक्रमामुळे बदनामी होते. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्या माणसाचे जगणे मुश्किल होते.

एखादा आरोप सिध्द झाला तर ही कारवाई स्वागतार्ह पण आधीच असे नको. त्यात सर्वच भरडले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. ॲड. धर्मेश चव्हाण यांनी, या उपक्रमात प्रामुख्याने ज्यांच्या पाठीमागे मोठी शक्ती नाही, अशा व्यक्तींना लक्ष्य केले गेल्याची टीका केली. या उपक्रमाच्या माध्यमातून बड्या लोकांपर्यंत पोहचणे अपेक्षित होते.

प्रकाश लोंढे टोळीवर कारवाई झाली असली तरी या कारवाईचा धसका घेत राजकीय पक्ष बदललेल्या व्यक्ती, गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. अशोक खरातकडूनही नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले. परंतु, त्याच्या पाठीशी असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावर मात्र अजूनही कारवाई झालेली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरविलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित उपक्रम वादात सापडल्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.