Sandeep Karnik on Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाला एक आठवडा उलटून गेला असून त्यावर सर्वच क्षेत्रातील मंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला धक्का बसला असून सामान्य कार्यकर्ते व जनतेमधूनही हळहळ व्यक्त होत आहे. यातच आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर एका शोकसभेदरम्यान व्यक्त केलेल्या भावना सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यावेळी संदीप कर्णिक यांनी केलेल्या उल्लेखांवरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांबद्दल काय म्हणाले संदीप कर्णिक?
संदीप कर्णिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका शोकसभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आता मोठा भाऊ माझ्यामागे नाही राहिला”, असंही संदीप कर्णिक म्हणाले.
“आपले हक्काचे, आपले आधार आणि आपल्यावर खूप प्रेम करणारे अजित पवार. आम्ही सेवेत आलो तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते. सुरुवातीच्या काही वर्षांतच आणि अगदी पहिल्या भेटीतच एका लहान भावाप्रमाणे त्यांनी आम्हाला जवळ घेतलं. त्यामुळे आपला मोठा भाऊ आता आपल्यामागे नाही राहिला”, असं संदीप कर्णिक म्हणाले.
संदीप कर्णिक यांना यायचे अजित पवारांचे फोन
दरम्यान, भावना व्यक्त करताना संदीप कर्णिक यांनी अजित पवारांनी त्यांना काही कामांनिमित्त केलेल्या फोन कॉलसंदर्भात आठवणी सांगितल्या. यावेळी समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे यांचादेखील त्यांनी उल्लेख केला.

“इथे अनेकजण बसले आहेत. मला अजित पवारांचे फोन यायचे. माणिकरावजी तुम्हीही इथे आहात. मागे एक विषय होता, त्याबाबतीत त्यांनी मला दरडावून सांगितलं होतं की ‘तुम्ही स्वत: त्यात लक्ष घालायचं आहे. काही प्रॉब्लेम व्हायला नको’. मी पहिल्यांदा नाशिकमध्ये रुजू झालो तेव्हा त्यांनी मला ठणकावून सांगितलं होतं की ‘सरोज माझी लहान बहीण आहे, तिची काळजी घ्यायची”, असं अजित पवार म्हणाले.
मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय – संदीप कर्णिक
“कदाचित अजित पवारांनी कधी जाहीरपणे हे दाखवलं नाही. पण ज्याप्रकारे त्यांचे फोन मला यायचे, ते पाहाता त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असायची, ते सगळ्यांची काळजी घ्यायचे. आज मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय”, अशा भावना यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केल्या.

