नाशिक : मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली. मागील दीड ते दोन महिन्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींवर कारवाई केली गेली. कारवाईच्या सत्रामुळे १० ते १५ हजार गुन्हेगार नाशिक सोडून पळाले. पळालेली मंडळी देशातील विविध देवस्थानांना भेटी देत देवाचा धावा करीत असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या सुमारे सहा हजार कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव आदी उपस्थित होते. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गुन्हेगारांवरील कारवाईबद्दल नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा, यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळी मंत्री महाजन यांनी उपस्थितांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तु्म्ही समाधानी आहात का, असा प्रश्न केला. काही लोकांनी नाशिकला वेठीस धरले होते. आम्ही गुन्हेगारी मोडून काढण्याचा संकल्प केला. गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त ताकीद दिली. गुंडांचा बिमोड सुरू आहे. नाशिकमधून १० ते १५ हजार लोक गायब झाले. कोणी शाम खाटू देवस्थान तर काही जम्मू काश्मिरला गेले.

वेगवेगळ्या ठिकाणी संबंधितांकडून देवाकडे आम्हाला वाचवा, असे साकडे घातले जात असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मागील दोन महिन्यांत खंडणी वसुली, अपहरण, मालमत्ता बळकावणे, खासगी सावकारीशी संबंधित विविध गुन्हे दाखल झाले आहेत. यातील काही प्रकरणात राजकीय मंडळींचा सहभाग समोर आला. यातील काहींना पोलिसांनी अटक केली असून काही फरार आहेत. पोलिसी कारवाईच्या भीतीचे फरार झालेली मंडळी देशातील विविध धार्मिक स्थळांना भेटी घालून देवाचा धावा करीत असल्याचे महाजन यांनी नमूद केले.