नाशिक : आंतरराज्य दरोडा व घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोन जणांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकाला यश आले. टोळीच्या म्होरक्याकडून चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस गस्त, टवाळखोरांवर कारवाई आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना एनआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर काही जण संशयास्पद हालचाली करत असून त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती मिळाली.

गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून खातरजमा केली असता सहा ते सात जण दोन दुचाकींवर अंधाराचा फायदा घेत संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करून धनराजसिंग शिख (वय २३, रा. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, मिरचीपूड, दोरखंड, कोयता व कणस आढळून आले.

चौकशीदरम्यान त्याने त्रिलोकसिंग सरदार (रा. गुजरात), अमनसिंग शिकलकर (रा. वडोदरा), बलवीरसिंग उर्फ गोलुसिंग शिकलकर (रा. मध्य प्रदेश), आझादसिंग शिकलकर (रा. गुजरात) आणि अनमोलसिंग (रा. मध्य प्रदेश) अशी साथीदारांची नावे सांगितली. त्याच्याकडून पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यांतील १३ गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, भ्रमणध्वनी, घड्याळ असा एकूण ४ लाख ४३ हजार ४६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दिवसा टेहळणी

नाशिक शहरातील विविध भागांत ही टोळी दोन-दोन जणांच्या गटाने वेगवेगळ्या दुचाकींवर फिरत असे. एखादे बंद घर किंवा इमारतीतील बंद फ्लॅट दिसला की रात्री त्या ठिकाणी घरफोडी करण्याचे नियोजन केले जात असे. या टोळीतील संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा विभाग दोनची कामगिरी

नाशिक पोलिसांना घरफोडी प्रकरणात हवा असलेला नोंदीवरील सराईत गुन्हेगार भरतसिंग शिकलगार हा वडोदरा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभाग दोनला मिळाली. त्यानुसार पथकाने वडोदरा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने भरतसिंग याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता भ्रमणध्वनी व दुचाकी असा १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून अजयसिंग बरनाल (रा. मध्य प्रदेश) आणि युवराजसिंग भाटिया (रा. बडवाणी) यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची त्याने कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने भरतसिंग याला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.