नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दुसरीकडे, त्याच्या अत्याचाराच्या चित्रफिती समाज माध्यमात टाकणाऱ्यांवरही विशेष तपास पथकाची करडी नजर आहे. याबाबत पोलीस तसेच विशेष पथकांनी इशारा दिल्यानंतरही आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमात टाकणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असतांना आत्ता पर्यंत कोपरगाव येथील दोन, बीड येथील एक आणि सातपुर येथे सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विशेष तपासी पथकाने दिली आहे.
खरातविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या पीडित महिलांच्या चित्रफिती काही जणांनी समाज माध्यमात टाकल्या आहेत. विशेष पथक तसेच नाशिक पोलिसांनी पीडित युवती, महिला यांची ओळख समाज माध्यमांतून किंवा अन्य माध्यमातून होईल, अशी चित्रफित टाकण्याची कृती करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
असे असतानाही आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमातून वारंवार दाखविण्यात येत असल्याने समाज माध्यमावर सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणाकडेही पीडितेची किंवा तिच्या नातेवाईकांची, तिच्या घराची, कुटूंबियांची ओळख उघड होईल अशा चित्रफिती, खोडसाळपणा केलेल्या चित्रफिती, छायाचित्र असल्यास ते तत्काळ काढून टाकावे, माध्यमात ते टाकू नये, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर तसेच त्या समूहाच्या ॲडमिनवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरातील बीएमडब्ल्यू या व्हॉट्स अप ग्रुप वर तीन जणांनी या चित्रफिती प्रसारित केल्या. या तीघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सिडको आणि सातपुर वॉलमन या व्हॉट्स अपग्रुपवर ॲडमिन रमीज शेख, राहुल पवार,प्रवीण काटे, राहुल हिवाळे , साहिल सय्यद तसेच अन्य सदस्य यांनी आक्षेपार्ह्य चित्रफिती प्रसारित केल्या. या संशयितांविरूध्द सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यास सुरूवात झाली आहे.
अशोक खरात भोंदुबाबा विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र या मध्ये पिडीतांच्या दृकश्राव्य चित्रफिती नवमाध्यमांतुन प्रसारित होत आहे. या विषयी मिळालेल्या वरिष्ठांच्या सुचनेनुसार सायबर पेट्रोलिंग दरम्यान फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स या नवमाध्यमातील ६५ वापरकर्ते यांनी पिडीत महिलांचे अश्लिल चित्रफिती, प्रतिमा, एआयतंत्रज्ञानाच्या मदतीने मॉर्फिंग करून प्रसारित केल्या. अशा ६५ प्रोफाईल धारकांविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
