नाशिक – जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारा सावकार भारत लोखंडे अखेर गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात आला आहे. यामुळे नाशिक शहर परिसरात सुरू असलेल्या खासगी सावकारीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भारत लोखंडे (रा. वैदुवाडी) याने श्वेता फुलसुंदर यांना एक लाख रुपये कर्ज म्हणून दिले होते. कर्ज वसुलीसाठी लोखंडेने सतत तगादा लावला होता. पैसे न दिल्यास श्वेता यांना त्यांचे पती संदीप आणि कुटूंबातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्याजाचे पैसे न दिल्याने लोखंडे आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांनी संदीप फुलसुंदर यांना मारहाण केली होती. लोखंडेच्या त्रासाला कंटाळून संदीप यांनी राहत्या घरी ३१ जानेवारी रोजी गळफास घेतला. पतीच्या आत्महत्येला लोखंडे आणि त्याचे तीन साथीदार जबाबदार असल्याची तक्रार श्वेता फुलसुंदर यांनी उपनगर पोलीस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता संशयितांचा तात्काळ शोध घेण्यात यावा, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना केल्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपआयुक्त संदीप मिटके आणि गुंडाविरोधी पथकाने लोखंडे याची माहिती मिळवली. लोखंडे हा टाकळी गाव परिसरात असल्याचे समजताच त्याला शिंदे गल्लीतून ताब्यात घेतले. त्याला उपनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. लोखंडेने ज्यांना त्रास दिला असेल, अशांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.
नाशिकमध्ये खासगी सावकारांचे पेव मोठ्या प्रमाणावर आहे. खासगी सावकारी करणाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने ही सावकारी वाढत गेली. काही दिवसांपूर्वी सातपूरच्या अशोक नगर भागात एका खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून फळ विक्रेत्यासह त्याच्या घरातील तीन जणांनी आत्महत्या केली. पाथर्डी परिसरात नवविवाहित जोडप्याने सावकारी जाचाला कंटाळत आत्महत्या केली. राजकीय पदाधिकाऱ्यांनाही खासगी सावकारीचा विळखा पडला आहे. तक्रारदार खासगी सावकाराकडून कर्जाने पैसे घेतो. काही कागदपत्रांवर तक्रारदाराची स्वाक्षरी घेतली जाते. विशेष म्हणजे हे कागदपत्र कोरे असतात, यामध्ये स्थावर मालमत्ता, वाहन यासह मौल्यवान वस्तुंचा समावेश सावकाराकडून केला जातो. पैसे वसुली न झाल्यास मारण्याची धमकी, महिलेवर अत्याचाराची धमकी दिली जाते. नागरिकांनी नोंदणीकृत सावकारांकडून कर्ज घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

