नाशिक : शहरातील वाकडी बारव ते पंचवटी कारंजा दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे, लटकत्या वीज वाहिन्यांसह अन्य बाबींवर तातडीने उपाययोजना करून मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करावेत, अशी सूचना शहर पोलिसांनी महापालिका आणि महावितरण कंपनीला केली आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे प्रमुख समीर शेट्ये, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, लक्ष्मण धोत्रे, अंकुश पवार आदी उपस्थित होते. बैठकीत गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना येणाऱ्या विविध समस्या मांडल्या. यावर गांभिर्याने विचार करण्याची तयारी पोलीस यंत्रणेने दर्शविली. बैठकीनंतर उपायुक्त चव्हाण, अन्य पोलीस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाकडी बारव ते पंचवटी कारंजा या विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी महापालिका व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
मार्गावर जिथे खड्डे वा लटकत्या वीज वाहिन्या दिसल्या त्या बाबी संबंधित यंत्रणांना निदर्शनास आणून दिल्या गेल्या. विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना पोलिसांनी महानगरपालिका आणि वीज कंपनीला केली आहे.
हेही वाचा…Video: अहो आश्चर्यम… वीस वर्षांपासून बंद कूपनलिकेतून ६० फुटापर्यंत पाण्याचा फवारा
आगामी गणेशोत्सव शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करावा. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.