नाशिक : पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉ. कैलास राठी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश देण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेली मागणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मान्य केली. शहरातील रुग्णालयांना नियमित गस्तीदरम्यान पोलीस भेट देतील. पहिल्यांदा ३० खाटांवरील रुग्णालयांना प्राधान्य दिले जाईल. नंतर अन्य लहान रुग्णालयेही समाविष्ट केली जातील. स्थानिक पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांचे गट तयार करून डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन कर्णिक यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना दिले.

डॉ. राठी यांच्यावर रुग्णालयात रात्री काम करत असताना प्राणघातक हल्ला झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी आयएमए सभागृहात विविध वैद्यकीय व्यावसायिक संघटनांची बैठक पार पडली. यात आयएमए नाशिक, आयएमए नाशिकरोड, पंचवटी, फिजिशियन, दंत, होमिओपॅथी अशा विविध संघटनांचे पदाधिकारी व सुमारे २०० डॉक्टर उपस्थित होते. रुग्णालयात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. बैठकीनंतर वैद्यकीय संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वैद्यकीय सेवा बजावत असताना डॉ. राठींवर हल्ला झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अतिदक्षता विभागात जगण्यासाठी लढा देत आहेत. डॉक्टरांवर रुग्णालयात होणाऱ्या हल्ल्यांविरुध्द पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ व नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…नाशिकमध्ये आर्थिक वादातून रुग्णालयातच डाॅक्टरवर हल्ला

डॉ. राठी यांच्यावरील हल्ल्याने वैद्यकीय व्यावसायिक हादरले आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम पोलीस कारवाईतून व्हायला हवे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल नाशिक पोलीस जे उपक्रम सुरू करतील, त्यास सहकार्याची तयारी आयएमएने दर्शविली आहे.

हेही वाचा…नाशिकवरील पाणी कपातीचे संकट तूर्तास दूर

चर्चेअंती प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या रुग्णालयांना नियमित गस्तीवेळी पोलीस भेट देतील. पहिल्या टप्प्यात ३० खाटांपेक्षा अधिक रुग्णालयांना प्राधान्य दिले जाईल. नंतर लहान रुग्णालयेही यात समाविष्ट केले जातील, असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्याचे डॉ. स्वप्नांजली आव्हाड यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि त्या हद्दीतील डॉक्टर यांचा संयुक्त गट तयार करून संवाद राखला जाणार आहे. आयएमए प्रत्येक पोलीस ठाण्यातील रुग्णालय व प्रतिनिधीचा संपर्क क्रमांकाची यादी पोलिसांना देणार आहे. पोलिसांमार्फत २८ फेब्रुवारीपासून रुग्णालयांना भेटी देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते.