नाशिक – शहर परिसरातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या विशेष मोहिमेसाठी उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलीस ठाण्यात अभिलेखावरील हरवलेल्या, सापडलेल्या बालकांची सांख्यिकी माहिती अद्यावत करण्यात यावी, हरवलेल्या किंवा सापडलेल्या बालकांची माहिती तात्काळ https://missionvatsalya.wed.gov.in या संकेतस्थळावर भरावी, या कालावधीत आश्रमगृह, अशासकीय संस्था, रस्त्यावर भीक मागणारे मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालये आदी ठिकाणी काम करणारी मुले आदींची माहिती गोळा करत ते मानवी तस्करीचे बळी तर नाहीत ना, याची खातरजमा करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
या कालावधीत सापडलेल्या मुलांना बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावे, बालमजूर आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानासाठी पोलीस ठाणेनिहाय मिसिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. याचे काम प्रमुख अधिकारी, सेलचे अधिकारी आणि अंमलदार या पध्दतीने सुरू राहणार आहे.
पंचवटी विभागात प्रमुख अधिकारी म्हणुन सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सरकारवाडासाठी सहायक आयुक्त सुधाकर सुरडकर. अंबड विभागासाठी सहायक आयुक्त सचिन बारी, नाशिकरोड विभागासाठी संगीता निकम काम पाहणार आहेत. याविषयी सहायक आयुक्त मिटके यांनी, वर्षभरात अपहरण तसेच हरवलेल्या बालकांचा पोलीस ठाणेनिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. अशा प्रलंबित प्रकरणांचा तपास हा वैयक्तीकरित्या होणार आहे. यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांची नेमणूक करत पोलीस ठाणेनिहाय मिसिग सेलचे अधिकारी, अंमलदार काम पाहणार आहेत.
तसेच, १८ वर्षाच्या आतील बालकांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून प्रकरणाचा जलद निपटारा होईल, असे मिटके यांनी सांगितले. यात नाशिक हद्दीत हरवलेल्या काही बाहेरगावच्या बालकांचाही समावेश आहे. या सर्व तक्रारींचा दैनंदिन आढावा घेण्यात येणार आहे. जास्तीजास्त बालके त्यांच्या पालकांपर्यंत पोहचावीत यााठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मिटके यांनी नमूद केले.

