नाशिक – वाहनांची तोडफोड, गोळीबार, जबर दुखापत, हत्येचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्ह्यांद्वारे कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या सराईत हर्षद पाटणकर आणि त्याच्या टोळीवर शहर पोलिसांनी अखेर मकोकान्वये कारवाईचा बडगा उगारला. प्रचलित कायद्यांना टोळीचा म्होरक्या जुमानत नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांन्वये पाटणकरसह त्याचे सहा साथीदार अशा सात जणांविरोधात कारवाई करण्यात आली.
शहरातील गुन्हेगारीविरोधात शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी धडक मोहीम हाती घेतली. त्या अंतर्गत राजकीय दबाव झुकारून गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई सुरू झाली. राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारी मंडळींवर कारवाई झाली. परंतु, हर्षद पाटणकर वर्षभरापासून फरार होता. अलीकडेच त्याला अटक करण्यात आली. पाटणकर टोळीवर अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.
सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर आणि त्याच्या सहा साथीदाराचे पोलीस अभिलेखावरील गुन्हे आणि न्यायालयात १० वर्षात दखल घेण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन आवश्यक पुरावे व कागदपत्रे एकत्रित करण्यात आले. पाटणकर गुन्हेगारांना एकत्रित करून आर्थिक फायद्यासाठी शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडवून आणत असल्याचे उघड झाले.
अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १११ अन्वये संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने कलमात वाढ करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पाटणकर टोळीच्या कारवाया लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहतीत सुरु राहिल्या. पाटणकरविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आले होते.
२०२३ मध्ये त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटका झाल्यावर पाटणकरची समर्थकांनी मोटारीतून मिरवणूक काढली होती. आता टोळीप्रमुख हर्षल पाटणकर (२६), महेश गोकुळ उर्फ चिमण्या (२३), श्रवण पगारे, प्रदीप शेवाळे, मयुूर वानखेडे, मयूर निकम, निखील जाधव यांच्याविरुद्ध मकोकान्वये कारवाई करण्यात आली.
अंबड पोलिसांनी सदर गुन्ह्यात हर्षद पाटणकरला अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस अभिलेखावरील सराईत आणि संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, अंमलदार सुचितसिंग सोळुंके, गणेश कोठुळे, निखील बोडके, योगेश शिरसाठ यांनी केली आहे.
