नाशिक – कोणताही रोजगार मेळावा, नोकर भरतीवेळी आपल्या देशातील बेरोजगारीचे भयावह दर्शन घडते. एकेका जागेसाठी शंभर, एक हजार उमेदवार अशी भयानक स्पर्धा असते. अशा या स्पर्धेत आपला टिकाव लागण्यासाठी उमेदवारांनाही जीवतोड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र आहे. रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या या संघर्षात प्रसंगी शारीरिक आणि मानसिक दडपणामुळे, त्रासामुळे उमेदवारांचा बळी जाण्याचे प्रकार घडले आहेत. राज्यात नुकतीच अनेक ठिकाणी पोलीस भरती झाली. या भरतीवेळी धावतांना दोन उमेदवारांचा मृत्यू झाल्याची चर्चा असतानाच नाशिक जिल्ह्यात पोलीस भरतीत अवघ्या दोन गुणांंनी अपयश आल्याने एका तरुणीने आत्महत्या करुन जीवनच संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस भरतीत शारीरिक, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा असे टप्पे पार पाडावे लागतात. काही उमेदवार शारीरिक क्षमतेत कुठे छातीत, कुठे उंचीत कमी पडत असल्याने बाद होतात. काही जण मैदानी चाचणीत धावण्यात अपेक्षित अंतर निश्चित वेळेत पूर्ण करु शकत नसल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागते. तर, या दोन्ही टप्प्यातून पुढे जाणाऱ्यांना लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या तीनही फेऱ्यांमधून उत्तम गुण मिळविणाऱ्यांना पोलीस दलात सेवेचे संधी मिळते. सर्वच उमेदवारांच्या नशिबी हे नसते. अशावेळी नैराश्यामुळे काही अनुत्तीर्ण उमेदवारांकडून टोकाचे पाऊल उचलले जाते.
नाशिक जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. पोलीस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे घडली. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे ( २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. शनिवारी हा प्रकार घडला. प्रतीक्षाने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घरातील सदस्यांच्या लक्षात हा प्रकार येताच योगेश्वर सुरुडे यांनी तातडीने घोटी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक्षा ही पोलीस भरतीची तयारी करत होती. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत प्रतीक्षाला १२५ गुण मिळाले होते. भरती होण्यासाठी अवघे दोन गुण कमी पडल्याने ती प्रचंड निराश झाली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतीक्षा ही मेहनती व जिद्दी स्वभावाची असल्याचे तिच्या ओळखीच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस भरतीत यश मिळवून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, दोन गुणांनी अपयश आल्याने तिच्यावर मानसिक ताण आला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण धकाटे करीत आहेत. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या ताणाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
