नाशिक – मला नाही रहायचं याच्याबरोबर… याला माझ्याशी बोलण्यापेक्षा व्हॉट्सअप, फेसबुक महत्वाचे आहे. याला माझ्याशी काही देणंघेणं नाही. मोबाईल याच्यासाठी महत्वाचा आहे….याला मित्र परिवार महत्वाचा…मी कामावर गेल्यावर सतत कोणाच्या तरी संपर्कात असते, हा घ्या पुरावा…

नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात आलेल्या या आगंतुक पाहुण्यामुळे पोलीस विभाग हैराण आहे. समाजमाध्यमांचा नात्यात झालेला शिरकाव अनेक संसार विस्कटविण्यासाठी कारणीभूत होत असल्याचे धक्कादायक चित्र शहर परिसरात आहे.

संवादाचे माध्यम, माहितीची जलदपणे देवाण-घेवाण म्हणून समाज माध्यमांच्या वापरावर भर देण्यात येत आहे. बऱ्याचदा आपली वैयक्तिक माहितीही समोरील व्यक्तीपर्यंत पोहचवली जाते. वैयक्तिक आयुष्यातील माहिती हाच नात्यांमध्ये मुख्य अडसर ठरु लागला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भरोसा सेल हा कौटुंबिक वादावर काम करीत आहे. यामध्ये बहुसंख्य तक्रारींचा सूर हा दोन्ही कुटूंबातील घरच्यांचा हस्तक्षेप, लग्नानंतर हवे असणारे स्वातंत्र्य, बाहेर असणारे संबंध, आर्थिक अपेक्षा, तडजोड करण्याची तयारी नसणे यासह अन्य किरकोळ कारणे हा असतो. परंतु, काही वर्षांपासून समाज माध्यमांचा वापर या कारणांमध्ये अग्रस्थानी असल्याचे निरीक्षण भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी नोंदवले.

समाज माध्यमांमध्ये फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टा यासह अन्य काही माध्यमातून पती-पत्नी एकमेकांच्या सामाजिक वर्तुळात असलेल्या संपर्कावर लक्ष ठेवून आहेत..आपला पती किंवा पत्नी कोणाच्या संपर्कात आहे, कोणाशी जास्त वेळ चॅट करतात, त्यांचे स्टेट्स काय यासह अन्य बारीक सारीक नोंदीचा तपशील थेट संवाद साधण्यापेक्षा त्यांचे भ्रमणध्वनी तपासत रेकॉर्डिंग केले जात आहेत. संशय बळावल्यावर एकमेकांच्या चारित्र्यावर आरोप-प्रत्यारोप केले जातात. भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यावर त्यांच्याकडूनच याविषयी पुरावे दिले जातात, असे तायडे यांनी नमूद केले. समाज माध्यमांपेक्षा आपल्या जोडीदारांशी थेट संवादावर भर देणे गरजेचे आहे. गैर समजामधून नात्यांची वीण उसवली जाते. काहींना आपल्या जोडीदाराला अद्यल घडवायची असते. या सगळ्यांचा मुलांच्या भवितव्यावर वेगळा परिणाम होतो. परंतु, समूपदेशनानंतर अनेकांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यंदा १९० हून अधिक जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि नव्याने संसार सुरू केला असल्याची माहिती तायडे यांनी दिली.

भरोसा कक्षाकडे वर्षभरात स्थानिक पातळीवर, राज्य महिला आयोगाकडून तसेच न्यायालयाकडून काही तक्रारी प्राप्त होतात. त्यानुसार भरोसा कक्षात त्याचे वर्गीकरण करुन काम करण्यात येते. नाशिक शहर परिसरात वर्षभरात ९६५ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १९२ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ३१७ जोडपी न्यायालयात गेली. यामध्ये १५५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. तर ६६४ लोकांनी अर्ज दिल्यानंतर तिथेच थांबणे पसंत केले. तर २८३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.