नाशिक : शहरात कुंभमेळ्याशी संबंधित रस्ते तसेच विविध विकासकामांसाठी सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. महापालिका प्रशासनाने ‘खड्डेमुक्त नाशिक’चा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याला छेद देणारी आहे. हिरावाडीतील अमृतधाम परिसरात खड्ड्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात रस्त्यांचे रुंदीकरण, जलवाहिन्या टाकणे तसेच विविध केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्याची कामे सुरू आहेत. या खोदकामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘खड्डेमुक्त नाशिक’ची घोषणा करत कोल्ड मटेरियलसह अन्य साहित्याच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे केवळ वरवरची असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी माती टाकल्याने चिखल तयार होऊन दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत.
हिरावाडीतील अमृतधाम परिसरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात कुणाल महाले आणि प्रभाकर माने हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांनाही आठ ते दहा टाके पडल्याची माहिती आहे. हा अपघात खड्ड्यामुळेच झाल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका प्रियांका माने यांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अमृतधाम परिसरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. दरम्यान, खोदकाम व खड्डे यामुळे अनेक रस्त्यांवर लहान-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये आतापर्यत पाच वाहनधारकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी होत आहे. खड्ड्यांविरोधात आंदोलनांचे सत्र सुरू असून रस्त्यांवरील परिस्थिती मात्र बदललेली नसल्याच्या तक्रारी होत आहेत.
गोदाकाठावर एक युवक खड्ड्यात
गोदाकाठावरील सांडव्याच्या देवी मंदिरासमोर गटाराच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्या ठिकाणी संरक्षणात्मक व्यवस्था अपुरी असल्याने एक युवक थेट खड्ड्यात पडला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
