नाशिक : कुंभमेळ्याच्या कामांसाठी झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांवरून जनक्षोभ उसळला असताना, महायुतीतील वादात नाशिकची अक्षरश: वाताहत झाली आहे. पालकमंत्रीपदाचा पेच कायम राहिल्याने कुंभमेळा नियोजनाची सूत्रे भाजपने आपल्या हाती घेत नाशिकवर वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी, मित्रपक्षांचे स्थानिक तीन मंत्री नियोजनातून अलिप्त झाले. खोदकाम, खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे नाशिककरांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी अलिप्तपणा सोडला असला, तरी त्यातही नाशिकच्या या परिस्थितीला जबाबदार कोण, हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरभर झालेल्या खोदकामांमुळे नाशिकची अवस्था बिकट झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सात महिन्यांत शहरात ३१० रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा, गटार, गॅस वाहिनी आदी कामांसह विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर माती, चिखल आणि खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. अनेक ठिकाणी वाहनचालकांचे नियंत्रण सुटणे, वाहन दुभाजकावर आदळणे किंवा इतर वाहनांशी धडक होणे अशा विविध कारणांमुळे अपघात घडत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने नाशिककरांचे अनेक महिन्यांपासून हाल होत आहेत. मात्र, याविषयी आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने थेट प्रतिक्रिया दिली नव्हती.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आणि शासनाला जबाबदार धरले. नाशिकमध्ये जे सुरू आहे ते निषेधार्ह आहे. असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनासह या कामांची जबाबदारी असलेल्या कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाही अप्रत्यक्षपणे दिला. नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी सूचक भाष्य करत, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय आता संपुष्टात आल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.

पालकमंत्रीपदावरून मतभेद

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पदावरून महायुतीत टोकाचे मतभेद आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) विरोधामुळे गिरीश महाजन यांना जाहीर झालेले पालकमंत्रीपद मिळू शकले नव्हते. शिंदे गट दादा भुसे यांच्यासाठी आग्रही आहे. तर नाशिकमध्ये सर्वाधिक सात आमदार असल्याच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तत्कालीन मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनीही या पदावर दावा केला होता. त्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी प्रदीर्घ काळ नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनाच पुन्हा पालकमंत्री करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती. मात्र, भाजपला स्वतःकडे ठेवता न आलेले पालकमंत्रीपद मित्रपक्षालाही देण्यात आले नाही. त्याऐवजी कुंभमेळ्याची जबाबदारी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्षात नाशिकचे ‘पालकत्व’ महाजन यांच्याकडेच देण्यात आल्याची भावना मित्रपक्षांत आहे.

कुंभमेळ्यासंदर्भात आयोजित अनेक बैठका सत्ताधाऱ्यांमधील केवळ महाजन यांच्या उपस्थितीत होत असल्याने मित्रपक्षांच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.

भुजबळ यांनी खोदकामे आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे कुंभमेळामंत्र्यांनी तरी लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचा रोख लक्षात घेत महाजन यांनीही कधी नव्हे इतकी कामे नाशिकमध्ये होत असल्याचे उत्तर दिले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे अजूनही नाशिकवरून उद्भवलेल्या वादापासून अलिप्तच आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या राजकारणात नाशिकची मात्र फरफट होत आहे.

जिल्ह्यात पालकमंत्री असो वा नसो, कोणतीही दुर्घटना घडली की मी तातडीने नाशिकला धाव घेतो. अतिवृष्टी किंवा इतर संकटांच्या काळात रात्री तीन-चार वाजेपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले आहे. नाशिकच्या प्रश्नांवर कधीही कमी पडलो नाही. खड्ड्यांची समस्या आठवडाभरात दूर होईल. नाशिककरांना पालकमंत्र्याची कमतरता जाणवणार नाही. – गिरीश महाजन (कुंभमेळामंत्री)

गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष काहीही बोललो नाही. माध्यमांद्वारेच त्यांना जे सांगायचे ते सांगितले आहे.– छगन भुजबळ (मंत्री, अन्न व नागरी पुरवठा)