नाशिक – कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील रस्त्यांवरील खोदकामे, खड्डे आणि चिखलमय स्थिती नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत खड्ड्यामुळे प्राण गमावणाऱ्या नीलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेवकांनी महापालिकेतील बांधकाम विभागासमोर आंदोलन केले. तर शिवसेनेने (ठाकरे गट) खड्डेमय नाशिकला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) जबाबदार असल्याचा आरोप करत महापालिका मुख्यालय व महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खड्ड्यांमुळे अपघात होत असताना कुणावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही. आता महापालिका आयुक्त व महापौरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख २८ रस्त्यांची कामे एकाचवेळी हाती घेण्यात आली. याशिवाय पाणीपुरवठा, गटार, गॅस वाहिनी आदी युटिलिटी कामांसाठी अनेक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले. पावसात खोदलेले रस्ते आणि माती-दगड टाकून करण्यात येणारी तात्पुरती दुरुस्ती यामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत लहान-मोठे अपघात घडत असून आतापर्यंत चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वाहने घसरून अनेक जण जायबंदी होत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला असंतोष गुरुवारी आंदोलनातून व्यक्त झाला.
अंबड औद्योगिक वसाहतीत खड्ड्यामुळे प्राण गमावणाऱ्या नीलेश कोतकर यांच्या पत्नी व पाच वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन शिंदे गटाच्या नगरसेविका किरण दराडे यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. कुंभमेळ्याच्या नावाखाली सर्वत्र खोदकाम करण्यात आले असून महापालिका प्रशासन आणखी किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत तसेच मृत कोतकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
ठाकरे गटाकडून मनपा प्रशासन, सत्ताधारी लक्ष्य
खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची छायाचित्रे घेऊन शिवसेना (ठाकरे गट)ने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणि त्यानंतर महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी खड्ड्यांच्या बिकट स्थितीला महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) जबाबदार असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. मागील सभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे म्हटले होते. त्यानंतरही अपघात घडत असून अद्याप तसे गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न केशव पोरजे यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महापौर आणि महापालिका आयुक्तांवरच गुन्हा दाखल व्हायला हवा. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असून त्या जबाबदारी झटकत असतील, तर ते योग्य नसल्याचेही पोरजे यांनी म्हटले आहे.
