नाशिक : शहर परिसरात कुंभमेळ्याच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. खोदकाम तसेच पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. या खड्डयांनी आणि नाशिक महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेने चौथा बळी घेतला. बुधवारी सायंकाळी नीलेश कोतकर (४०) या तरूण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ठिकठिकाणी पाऊस तसेच खोदकामामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाऐवजी मातीचा वापर ठेकेदाराकडून सर्रासपणे केला जात आहे. मातीमुळे रस्ते निसरडे होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याआधी खड्डयांमुळे अंबड लिंक रोडवर प्रभाकर निकम, जूनमध्ये श्रमिकनगर येथील प्रवीण गायकवाड, जुलैमध्ये मेरी येथील दीपाली बेळे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यात आता नीलेश कोतकर यांची भर पडली आहे.

कामटवाडे येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे नीलेश कोतकर हे मंगळवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना महिंद्रा कंपनीजवळ एक्सलो पॉईंटकडून अंबड गावाकडे जाणाऱ्या मालवाहतूक वाहन समोरुन आले. त्यामुळे खड्डा चुकविण्याचा नीलेश कोतकर यांचा प्रयत्न असताना दुचाकीला मालवाहू वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात नीलेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

शहरातील खड्डे आणि उदासीन यंत्रणेने हा बळी घेतला असल्याचा आरोप कोतकर यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी केला आहे. कोतकर यांच्या मृत्युमुळे त्यांची पाच वर्षाची मुलगी रुही हिचे पितृछत्र हरपले. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटूंबावर आघात झाला आहे. हलगर्जीपणाला जबाबदार अधिकारी, ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. अपघात प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहनचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूमाऐवजी मातीमुळे अपघाताचा धोका अधिक

पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून मुरूम टाकण्याची अट आहे. मात्र ठेकेदार केवळ काम उरकते घेत मातीचे प्रमाण अधिक असलेला भराव टाकत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी या मातीचा चिखल होऊन दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्ते इतके निसरडे झाले की चालणे मुश्किल होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत चार बळी गेले असून एक जण गंभीर जखमी आहे.