नाशिक – आगामी कुंभमेळा कामानिमित्त नाशिकमध्ये करण्यात आलेले खोदकाम, खड्डे आणि चिखलामुळे शहरात दररोज दुचाकी घसरणे, खड्ड्यात वाहने अडकणे असे प्रकार होत असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. नाशिकच्या या अवस्थेवरुन विरोधकांनी नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांविरुध्द रान उठवले असताना महायुतीतच यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यातील मागील दोन दिवसांमधील विधानांमधून त्याची प्रचिती येते. या गदारोळात भाजपचे नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी ठेकेदारांकडून होत असलेल्या दादागिरीची बाजू मांडल्याने राज्यातील आणि नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजप ठेकेदारांच्या दादागिरीपुढे हतबल झालाय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी निवेदनातून ठेकेदारांच्या दादागिरीवर प्रकाशझोत टाकला आहे. भारतीय जनता पक्षाने नाशिकमधील खड्डे त्वरीत बुजविण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना सूचना दिल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. आजपर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे. अनेक नागरिक अपघातांमुळे जखमी झाले आहेत. काही अपंग झाले आहेत. सातपूर येथील एका व्यक्तीचा खड्ड्यात पडुन मृत्यून झाल्याने नाशिक महानगर पालिकेने १० लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. खरे तर या विषयाला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप सुनील केदार यांनी केला आहे.

ठेकेदारांची कार्यप्रणाली कशी ?

“ज्या ठेकेदारांनी कामे घेतली आहेत. ते उपलब्ध नाहीत. त्यांनी त्यांच्या नावावर घेतलेली कामे इतर उपठेकेदारांनी घेतली असुन जर नगरसेवकांनी निकृष्ट कामांबाबत विचारणा केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देण्यात येते..यासाठी संबंधित ठेकेदार, महानगरपालिका आयुक्त आणि अधिकारी जबाबदार आहेत”, असेही सुनील केदार यांनी म्हटले आहे. “वास्तविक ज्या ठेकेदारांना कामे दिलेली आहेत, त्यांची नावे, मोबाईल नंबर व कामांची सर्व माहिती कामांच्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे. पण असे होत नाही. काही ठेकेदारांनी त्यांच्या कामांच्या ठिकाणी गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुले ठेवली आहेत. त्यांना जर कामांबाबत विचारणा केली तर ते दादागिरी करतात “, अशी हतबलता केदार यांनी व्यक्त केली आहे.

नाशिककरांचा भाजपवर राग

“नाशिक शहराची ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी वाट लावली आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झालेले आहेत. त्याचा राग ते नगरसेवक, आमदार आणि भाजपवर काढत आहेत. ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आले आहेत. पण यावर काहीही होणार नाही. नाशिकमध्ये ठेकेदारांनी साखळी तयार केली आहे. त्यामुळे ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी झाली आहे. त्यांची मोनोपाॅली तोडणे गरजेचे आहे. या सर्व गंभीर बाबींवर महापालिका आयुक्तांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी कुंभमेळा जर यशस्वी करायचा असेल आणि विकासकामे दर्जेदार करायची असतील तर महापालिका आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन जलदगतीने निर्णय घेऊन कामे केली पाहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे”, असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केले आहे.

भाजपचा टास्क फोर्स

भाजपने टास्क फोर्स स्थापन केला आहे. यात आमदार, नगरसेवक,मंडल अध्यक्ष, ३१ प्रभागातील पक्षाचे पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना आपापल्या प्रभागातील खड्डे व इतर अत्यावश्यक कामांबाबत सूचना करून कामे करून घ्यायची आहेत. तसेच ९८२३१२६९०४ या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी सूचना कराव्यात. त्यानुसार संबंधित महापालिका आयुक्त, अधिकारी यांच्याकडून कामे करून घेतली जातील. जर संबंधित अधिकारी आणि आयुक्तांनी याची दखल घेतली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याचा इशारा, सुनील केदार यांनी दिला आहे.