नाशिक – कुंभमेळा कामांमुळे खड्डेमय झालेल्या नाशिकमध्ये महायुतीतील मतभेद उफाळून आले आहेत. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) आंदोलनानंतर नाशिकच्या दुर्दशेवरून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरात ठिकठिकाणी फलक उभारून छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. खड्ड्यांच्या गंभीर विषयात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा निघाल्याने महायुतीत पुन्हा मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली. नाशिकमधील या फलकबाजीची माहिती समजल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे फलक काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शहरभर लागलेले फलक अवघ्या काही तासांत गायब झाले.
कुंभमेळ्यातील रस्ते व अन्य कामांसाठी झालेल्या खोदकामाचा फटका पावसाळ्यात नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत चार ते पाच जणांना प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. नाशिकच्या बिकट स्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (अजित पवार) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणारे फलक शहरात लावण्यात आले.
दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात आली. सामान्य नाशिककरांच्या मनातील ही भावना असल्याचा उल्लेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसने फलकावर केला होता. सोमवारी सकाळपासून शहरातील प्रमुख रस्ते व चौकांत झळकलेले हे फलक काही तासांत गायब झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने १० ठिकाणी हे फलक उभारले होते.
या संदर्भात शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार फलक काढून घेण्यात आल्याचे सांगितले. फलक लावण्यापूर्वी आम्ही पूर्वकल्पना दिली नव्हती. आमच्यासह नाशिककरांची ही भावना होती. मात्र, भुजबळ यांनी सूचित केल्यानुसार सर्व फलक काढून घेण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले.
पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
फलकबाजीमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुंभमेळा नियोजनापासून स्थानिक मंत्री अलिप्त असल्याची मित्रपक्षांची भावना आहे. कुंभमेळ्यातील कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले. खड्डेमय स्थितीवरून अलीकडेच मंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. तर कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी खड्ड्यांची समस्या आठवडाभरात मार्गी लागेल. नाशिकला पालकमंत्री असो अथवा नसो, कोणत्याही आपत्तीत आपण धावून येतो. नाशिकच्या प्रश्नांवर कधीही कमी पडलो नसल्याने नाशिककरांना पालकमंत्र्याची कमतरता जाणवणार नसल्याचे म्हटले होते. महायुतीतील संघर्षात छगन भुजबळांना पालकमंत्री करा या मागणीचे फलक काढून घेण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली.
