नाशिक – कुंभमेळा कामांसाठी संपूर्ण शहरात झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये जनक्षोभ उसळला असताना ‘खड्डेमय नाशिक’बाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आजवर कुठलेही भाष्य केले नव्हते. परंतु, या गंभीर प्रश्नावर आता कुंभमेळा प्राधिकरणालाही भाष्य करावे लागले आहे. शालेय वाहतुकीच्या बस आणि अन्य वाहनांना सध्या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असून, याबद्दल कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली.

सर्वत्र खोदलेले रस्ते, खड्डे आणि चिखल यामुळे वाहनधारकांच्या जिवावर बेतू लागल्याने शहरवासीयांमध्ये कमालीचा रोष प्रकट होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाने मोठ्या संख्येने विकासकामांना हिरवा कंदील दाखवला. एकाचवेळी ही कामे सुरू झाल्याने पावसात रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून, यातून सुटका कधी होणार, याचे उत्तर प्राधिकरणाने विद्यार्थ्यांसमोर दिले. इन्सॅलिअर शाळेतील कार्यक्रमात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यापूर्वी कधीही झाली नव्हती, इतकी कामे होत असून नाशिकला औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करून नव्या उंचीवर नेण्याची संकल्पना असल्याचे ते म्हणाले.

कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी विद्यार्थ्यांना तुमच्या घरातील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी कोण सांभाळते, असे प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. नाशिक महापालिका केवळ रस्तेच नव्हे, तर पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, ऑप्टिकल फायबर, गॅस व वीज वाहिन्यांची (युटिलिटी) कामे करीत आहे.

शहरात २८ ते ३० रस्ते, आठ पूल आणि ग्रामीण भागात ४० रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामीण भागात युटिलिटीची कामे नसल्याने रस्त्यांची कामे सोपी होतात. शहरात मात्र या व्यवस्थांचा प्रश्न असतो. त्यामुळे आधी या सुविधांची कामे करून नंतर रस्त्यांचे काम करावे लागते. सध्या आपण पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहोत. पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नसल्याने हे काम थांबवले आहे, असे त्यांनी सूचित केले.

१२ कोटी भाविकांचे आपण यजमान…

रस्त्यांसह इतर कामांमुळे त्रास होत असल्याची मला जाणीव आहे. बसमधून येताना तुम्हाला खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो. याबद्दल मी क्षमा मागायला पाहिजे. पण एखाद्या घरात लग्न असेल, तर आपण घर सजवतो, काही कामे करतो आणि मेहनत घेतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या १२ कोटी भाविकांचे आपण सर्व यजमान आहोत. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात घरात थोडीफार अडचण होते, त्रास सहन करावा लागतो. आम्हीही हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. काही महिन्यांचा त्रास सहन केल्यानंतर संपूर्ण शहरात चांगली परिस्थिती निर्माण होईल.

अनेक कामे न दिसणारी…

आपल्या सर्वांना फक्त रस्त्यांची कामे दिसतात. जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कामे दिसत नसल्याकडे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी लक्ष वेधले. ४७४ एमएलडी क्षमतेच्या नव्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमुळे गोदावरी नदी स्वच्छ राहील. आज जे सांडपाणी आणि कचरा नदीत जात आहे, ते जाणार नाही. नाशिक हे राहण्यासाठी अधिक उत्तम आणि सुरक्षित शहर बनेल. चोरी किंवा अपघातांची ओळख पटविण्यासाठी पाच हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असतील, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.