नाशिक – शहरात सिंहस्थ कुंभमेळयाच्या नावाखाली कुठलेही नियोजन न करता संपूर्ण शहर खोदून ठेवल्याने शहर काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या राजीव गांधी भवन प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. शहरात कुंभमेळ्यासह वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे शहरात पाच जणांचा बळी गेला तर १०० हून अधिक वाहनचालक, नागरिक जायबंदी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतांना आता या वादात कॉग्रेसने उडी घेतली आहे.

शहर काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवन प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश खैरे यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महानगरपालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांनी स्वतः टोळ्या निर्माण केल्याचा आरोप केला. कुंभमेळयासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांवर त्यांचा डोळा असुन ठेका संबंधित ठेकेदारालाच कसा मिळेल, याची काळजी घेताना ते नाशिकविषयी असलेली जबाबदारी पूर्णपणे विसरले आहेत. त्यांना भानावर आणण्याकरता हे आंदोलन असल्याचे खैरे यांनी नमूद केले. खड्डे अपघातात मृत पावलेल्या नागरिकांची संख्या ही पाच नसून ती शंभरपेक्षा अधिक असल्याचा दावाही खैरे यांनी केला.प्रशासन आकडेवारी खोटी सांगून नाशिककरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनावेळी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात ‘ मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, ‘अधिकारी भाऊ आता तरी पैसे नको खाऊ, ठेकेदार भाऊ आता तरी, पैसे नको खाऊ. ‘ धिक्कार असो धिक्कार असो कमिशन खोरी करणाऱ्यांचा धिक्कार असो ‘ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, महानगरपालिका हद्दीतील खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा., खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना जाहीर केलेली मदतची रक्कम तुटपुंजी असून ती अधिक द्यावी तसेच जखमी व्यक्तींना उपचारासाठी तातडीने नाशिक मनपा आणि राज्य शासनाकडून मदत मिळण्यास मदत करावी, खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधासारखे फौजदारी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर हेही उपस्थित होते.

नाशिक शहरातील खोदकाम आणि खड्ड्यांमुळे मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर राजकीय पक्षांना जाग आली आहे. नाशिककरांमधील असंतोष लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रवेशव्दारासमोर आंदोलन करण्यात आले.