नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुक्रवारी मुंबई येथे कुंभमेळा कामांचा आढावा घेतला जाणार असल्याने खड्ड्यांच्या प्रश्नावरून होणारी महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आता शनिवारी होणार आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि आम्ही नाशिककर यांच्यात बैठक पार पडली. खड्डे बुजविण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी महापौर सहायता निधीची स्थापना केली जाणार आहे. दुचाकी वाहनधारकांनी वाहने चालविताना काळजी घ्यावी, हेल्मेट परिधान करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला महापौर हिमगौरी आहेर यांनी शिष्टमंडळाला दिला.
कुंभमेळा कामांसाठी झालेले खोदकाम, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे वाढते अपघात यावरून महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ उडाला होता. या प्रश्नावर विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी विशेष सभा होणार होती. दरम्यानच्या काळात याच दिवशी कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक मुंबई येथे निश्चित झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यामुळे मनपाची सर्वसाधारण सभा एक दिवस पुढे ढकलण्यात आली. आता ही सभा शनिवारी होणार आहे. खड्डे, रखडलेली विकास कामे, याविरोधात ‘आम्ही नाशिककर’तर्फे महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. या शिष्टमंडळाशी बुधवारी महापौर आडके यांनी चर्चा केली. आम्ही नाशिककर पदाधिकारी आंदोलनावर ठाम असून सर्वसाधारण सभेच्या वेळापत्रकात बदल झाल्याने त्यांनी शनिवारी आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतत असून लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी होत असल्याची बाब करण गायकर आणि पदाधिकाऱ्यांनी मांडली. महापौर आडके यांनी खड्डे बुजवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून पावसाळ्याआधी आणि पावसानंतरच्या कामांचे योग्य नियोजन झाले नाही. कामांना विलंब झाला. अपघातामुळे जखमी होणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी महापौर सहायता निधी स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे महापौरांनी सांगितले.
बैठकीत शहरातील रस्ते व खड्ड्यांच्या प्रश्नावर सामाजिक पदाधिकारी आणि नागरिकांसोबत उपमहापौर विलास अण्णा शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र भाऊ सानप यांच्या समवेत सविस्तर चर्चा केली. या प्रश्नांची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून ‘खड्डेमुक्त नाशिक’ साकारण्याचा आमचा स्पष्ट निर्धार असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी म्हटले आहे. यावेळी करण गायकर, छबू नागरे, ॲड. अजिंक्य गिते, सोनू नागरे तसेच नागरिक उपस्थित होते.
