नाशिक – कुंभमेळा कामांसाठी झालेली खोदकामे आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे उसळलेल्या जनक्षोभात आंदोलनाची धग वाढत आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रतिकात्मक तिरडी मोर्चाद्वारे महापालिकेसमोर आंदोलन केले. तर आम आदमी पक्षाने थाळीनाद केला. भद्रकाली परिसरात ‘नाशिक वाचवा’ अभियानात ‘नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला’ तसेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटातर्फे मखमलाबाद लिंक रस्त्यावर खड्ड्याला हार घालण्याचे आंदोलन झाले.

शहरात सर्वत्र झालेली खोदकामे आणि खड्डे यामुळे अपघातांचा आलेख उंचावत आहे. आतापर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण जायबंदी झाले. रस्त्यांवरील धोकादायक स्थितीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असल्याने राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. दररोज विविध आंदोलनातून मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयावर प्रतिकात्मक तिरडी घेऊन मोर्चा काढण्यात आला. शहरातील रस्ते प्रशासक काळात बांधले गेले. त्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्यास मनपा प्रशासन प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडीने कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. स्वत: फायदा बघून त्यांनी ठेके दिले असून त्यांच्या बेनामी मालमत्तेचा शोध घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटातर्फे मखमलाबाद लिंक रस्त्यावरील कन्सारा मंगल कार्यालयाजवळ चिखमलय खड्ड्याला हार घालून मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

आपचा थाळीनाद

आम आदमी पार्टीने थाळीनाद करत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्युंना मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. कुंभमेळामंत्री सांगतील तसेच करावे लागत असल्याने महापौर, मनपा आयुक्त हतबल झाल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात थाळी वाजवून करोना निघून जाईल, असे सांगितल्याचा दाखला देत तशी थाळी वाजवून रस्त्यावरील खड्डे बुजतात का, हा प्रयोग आम्ही करून पाहत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. रस्ते दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेची चौकशी, दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी आपने निवेदनाद्वारे केली.

कुंभमेळा मंत्र्यांविरोधात घोषणा, फलक

भद्रकालीतील बादशाही गुजरात लॉज चौकात ‘नाशिक वाचवा’अभियानात खड्ड्याभोवती रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील प्रत्येक खड्डा एखाद्याच्या जिवावर उठलेला धोका असल्याचे सांगत आंदोलकांनी विविध आशयाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. या समस्येला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना जबाबदार धरून घोषणा दिल्या गेल्या. ‘नाशिक जिल्हा, खड्ड्यांचा बालेकिल्ला’, खिसे भरणे बंद करा, खड्डे भरणे सुरू करा, असेही फलक झळकले.