नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्त संपूर्ण शहरभर खड्डे आणि खोदकाम झाल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याची धग जाणवून लागल्याने राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आंदोलनांचा मार्ग जोपासू लागले आहेत. शहराची विकास कामांच्या नावाखाली झालेली बकाल अवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे याकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजप वगळता जवळपास सर्वच पक्षांची आंदोलने होत आहेत.
विशेष म्हणजे, महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आंदोलन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाच्या या आंदोलनाविषयी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
काही महिन्यांमध्ये नाशिकमध्ये रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. गटार, पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. या कामांमुळे नाशिकमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या विरोधात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने याआधीही आंदोलने केली आहेत.
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाच महिन्यातील चौथा बळी गेल्यानंतर इतर राजकीय पक्षही आंदोलनाच्या मैदानात उतरले. मनसेच्या वतीने महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महापालिका आयुक्त कार्यालयात शहरातील झालेली बकाल अवस्था व रस्त्याला पडलेले खड्डे यामुळे सामान्य नागरिकांचा झालेला मृत्यू याच्या निषेधार्थ झोपून आंदोलन केले. या आंदोलनात सुस्त अशा प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
प्रशासन फक्त टक्केवारीत मस्त असून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम प्रशासन करत आहे. कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आंदोलकांनी ठिय्या दिला. मात्र अधिकारी नसल्याने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची महापालिका पदाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक सुरू असताना बाहेर मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आली.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची महाजन यांनी भेट घेतली. मनसेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही नाशिकमधील खोदकाम आणि खड्ड्यांंमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी आंदोलन केले. राष्ट्रवादीचा अजित पवार गट राज्यातील सत्तेत भाजपबरोबर सामील असला तरी नाशिक महापालिकेत भाजपने त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही.
नाशिक महापालिकेतील सत्तेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने सहभागी करुन घेतलेले आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. हा प्रकार भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या लक्षात आणून देण्यात आल्यावर त्यांनी याविषयी शिवसेनेचे आंदोलन हे मैत्रीपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाजन यांच्या या प्रतिक्रियेचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनाकडे भाजप गांभिर्याने पाहत नसल्याचे यामुळे दिसून आले आहे.
