नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांची सुरू असलेली कामे, गॅस वाहिनीसह विविध उपयोगिता सेवांसाठी करण्यात आलेली खोदकामे आणि पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या खड्डेमय नाशिकच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहरात आतापर्यंत तब्बल २० हजार खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील एकूण खड्ड्यांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास ९० टक्के असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेची यंत्रणा चांगलीच कार्यप्रवण झाली आहे. ढाप्यांचीही दुरूस्ती केली जात होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महापालिकेने एकाचवेळी २८ प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्याचवेळी गॅस व जलवाहिनी, ऑप्टिकल फायबर आदी विविध उपयोगिता सेवांसाठी शहरातील अनेक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भर पडली.
पावसाळ्यात चिखलमय माती आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन काही वाहनधारकांना प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जायबंदी झाले. खड्ड्यांच्या प्रश्नावरून समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी मोर्चा काढून सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारला. खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिकेची विशेष महासभाही घेण्यात आली.
दरम्यान, मुंबईत मध्यंतरी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे निर्देश दिले होते. तसेच महानगर गॅस कंपनीची प्रलंबित गॅस जोडणीची कामेही तातडीने पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग दिला आहे.
९० टक्के दुरूस्ती…
नाशिक शहरात खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत एकूण २१ हजार खड्ड्यांपैकी जवळपास १९ ते २० हजार खड्डे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. खड्डे दुरूस्तीचे ९० टक्के काम झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली विविध कामे थांबविता येत नसल्याने शहरातील काही भागांत खोदकामाची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नव्याने खड्डे पडत आहेत किंवा बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा तयार होत आहेत. अशा ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याकडे लक्ष दिले जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
खड्डे शोधण्यासाठी सर्वेक्षण पथक
खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक वळविण्यासंबंधीचे सूचना फलक लावण्यात येत आहेत. तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरात नव्याने पडलेल्या खड्ड्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण पथक कार्यरत करण्यात आले असून, या पथकाकडून रस्त्यांची तपासणी केली जात आहे. तपासणीत आढळून येणारे खड्डे तात्काळ बुजविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
