नाशिक – नाशिक शहर सध्या खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्डे, त्यामुळे होणारे अपघात या कारणांमुळे गाजत आहे. याविषयी राजकीय मंडळींपेक्षा दररोज रस्त्याने कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नाशिककरांमध्ये अधिक संताप आहे. सर्वसामान्य जनतेप्रमाणेच उद्योजकांनाही रस्त्यांवरील खड्ड्यांनी त्रस्त केले असून त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाशिकरांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाला वाट मोकळी करुन देण्यासाठी खड्डे, रखडलेली विकास कामे, याविरोधात सात ऑगस्ट रोजी राजीव गांधी भवन या महापालिका कार्यालयास ‘आम्ही नाशिककर’ मोर्चा काढून घेराव घालणार आहेत.
कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचे निमित्त करुन पाच ते सहा महिन्यांपासून नाशिक शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. शहरात एकही रस्ता धड नाही. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची गरज नव्हती, ज्यांची स्थिती चांगली होती, ते रस्तेही खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये अधिक संताप आहे. रस्ते खोदताना पर्यायी मार्गच उपलब्ध करण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांमधूनच वाहन चालवावे लागत आहे. त्यातच पावसामुळे सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले. अपघातांमुळे पाच महिन्यांत पाच जणांचे बळी गेले. कित्येक जण जखमी झाले. रस्त्यांच्या स्थितीमुळे अनेक दुचाकीस्वारांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी असे आजार लागले.
नाशिककर असे वैतागलेले असताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे मात्र नाशिक सर्वांत सुंदर शहर करावयाचे असल्याने नागरिकांना थोडा त्रास होऊ शकतो, असे म्हटले आहे. नाशिकमधील महत्वाचे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असून त्यामुळे दर पावसाळ्यातील खड्ड्यांची समस्या निकाली निघेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पाच ते सहा दिवसात नाशिकमधील सर्व खड्डे बुजविण्यात येतील. खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दुसरीकडे, अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतींमध्येही रस्त्यांची वाट लागल्याने वसाहतीतील रस्ते काँक्रिटयुक्त करण्यासाठी उद्योजकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकिकडे, ही स्थिती असताना आता खड्डे आणि रखडलेल्या कामांमुळे होत असलेल्या त्रासाविरुध्द राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी ‘आम्ही नाशिककर’ म्हणून एकत्र आली आहे. नाशिक महानगर पालिकेची सात ऑगस्ट रोजी महासभा होणार आहे. हे निमित्त साधून त्या दिवशी सकाळी नऊ वाजता महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही नाशिककर च्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोर्चानंतर महापालिकेला घेराव, दुपारी तीन वाजता साखळी उपोषण करण्यात येमार आहे.
यादरम्यान, नशिकच्या समस्यांप्रश्नी समाधान होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना महापालिकेतून बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. नाशिककरांच्या करातून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. यास जबाबदार अधिकारी आणि संबंधितांविरुध्द कारवाई करावी, रस्ते खोदण्याआधी पर्यायी मार्ग वाहनचालकांना उपलब्ध करुन द्यावा, रखडलेली कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्वक करण्यात यावीत, रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना त्वरीत आर्थित मदत देण्यात यावी, अशा मागण्या आम्ही नाशिककर बैठकीत करण्यात आल्या आहेत. सात ऑग्सट रोजी महापालिकेवर निघणाऱ्या मोर्चात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छबू नागरे, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तू बोडके, अजिंक्य गिते, अंकुश राऊत आदींसह इतर अनेक जण उपस्थित होते.
