नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी सर्वत्र हाती घेतलेली विविध कामे, ‘एमएनजीएल’कडून गॅस वाहिनीसाठी सुरू असलेले खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. याच सभेत शहरातील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या सहा व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे सभागृहात मदत देण्याच्या कृतीवर एका ज्येष्ठ नगरसेविकेने नाराजी व्यक्त केली.
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेने एकाचवेळी २८ प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. रस्त्यांच्या कामाआधी जलवाहिनी, सांडपाणी, गॅस वाहिनी, फायबर ऑप्टिक्स, वीज वाहिनी व तत्सम उपयोगिता (युटिलिटी) कामांसाठी खोदकाम करण्यात आले. एमएनजीएलकडून आधीपासूनच गॅस वाहिनीसाठी खोदकाम सुरू आहे. परिणामी, मुसळधार पावसात खड्डेमय आणि चिखलमय झालेल्या रस्त्यांवर लहान-मोठ्या अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली. यात सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. खड्डे व खोदकामांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचे पडसाद शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेत विविध माध्यमांतून उमटले.
या सभेत आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या जितेंद्रसिंग गिरासे, प्रभाकर निकम, उज्वला गायकवाड, दिपाली बेळे, नीलेश कोतकर आणि मासुम शाह या सहा जणांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. याप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत विरोधकांनी घातलेला गोंधळ आणि सभागृहात धनादेश वितरित करण्याची कृती वेदना देणारी असल्याची भावना ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या चुका आणि नाकर्तेपणामुळे संबंधित व्यक्तींचा बळी गेला, हजारो जण जायबंदी झाले. आपण त्यांच्या कुटुंबीयांना सभागृहातील व्यासपीठावर धनादेश द्यायला नको होता. संबंधितांच्या घरी जाऊन धनादेश देणे योग्य ठरले असते, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले. प्रारंभी विरोधकांनी आंदोलन आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावर त्यांनी खेद व्यक्त केला. खड्ड्यांच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत काय तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असताना सुरुवातीला घडलेला प्रकार योग्य नव्हता, असेही त्यांनी सूचित केले.
