नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या विविध भागात सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि खोदकामांनी वाहनधारकांसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या कामांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध येत आहेत. यात नव्याने जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी दरम्यानच्या रस्त्याची भर पडली. सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी पुढील तीन महिने शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका सिग्नलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अलीकडेच टिळकवाडी सिग्नल ते सिटी प्राईड हॉटेल या मार्गावर १२ महिन्यांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. टिळकवाडी सिग्नल-महापौर निवास रामायण बंगला ते जलतरण सिग्नलपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. दोन टप्प्यात हे काम होईल. ते बारा महिने चालणार आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या कामासाठी टिळकवाडी सिग्नल ते सिटी प्राईड हॉटेलपर्यत दोन्ही बाजुच्या रहदारी मार्गावर वाहतुकीस प्रवेश वंद होत असताना आणखी एका मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध आले. जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी या मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका आणि दुसऱ्या टप्प्यात जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी केले जाईल. त्यावेळी विरुद्ध बाजुला हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका सिग्नलकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांना शरणपूर पोलीस चौकीकडून जुना गंगापूर नाका, पंचवटीकडे जाण्यासाठी शरणपूर पोलीस चौकी सिग्नलवरून पुढे एबीबी सिग्नल, महात्मानगर, जेहान सर्कलमार्गे गंगापूर रोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध बाजुला हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. वाहतूक नियोजन व अपघात होऊ नये म्हणून लोखंडी जाळ्या लावून रात्रीच्या वेळी चालकांना स्पष्ट दिसेल असे रेडियमचे प्रवेश बंद व ‘डायव्हर्जन’ फलक लावणे आणि २० ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करणे अनिवार्य आहे.
रस्ते कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार किंवा कंपनी जबाबदार राहील, असे सूचित करण्यात आले आहे. वाहतूक निर्बंधाची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली असून १९ एप्रिलपर्यंत म्हणजे पुढील तीन महिने ती अमलात राहणार आहे. हे निर्बंध पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना लागू राहणार नाहीत.
कुंभमेळ्यास दिड वर्षापेक्षा कमी कालावधी राहिल्याने प्रशासनाकडून कामांना वेग देण्यात आला आहे. शहरात इतरत्रही वेगवेगळ्या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.
