नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातून जाणारा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावरील महत्त्वाची चौफुली असणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना द्वारका चौकाच्या सुधारणेसाठी २१४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमातून दिली होती. परंतु, त्यांच्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरील ही पोस्ट काही वेळातच हटवण्यात आली होती. आता द्वारका चौकातील भुयारी मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू होत असून, या परिसरातील अवजड वाहने आणि बसेसच्या वाहतुकीवर पोलिसांनी निर्बंध आणले आहेत.

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील द्वारका चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी चार प्रमुख रस्ते आणि सात उप रस्ते एकत्र येतात, ज्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. कुंभमेळ्याच्या काळात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन द्वारका चौक सुधारणा प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत आधुनिक पद्धतीने चौकाची पुनर्रचना, उड्डाणपूल, ‘ग्रेड सेपरेटर’, सेवा रस्ते, सिग्नल यंत्रणा, पादचारी सुविधा तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी आवश्यक सोयी-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल; तसेच मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढून प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली होती, मात्र आचारसंहितेमुळे ती पोस्ट हटवण्यात आली होती. आता आचारसंहिता संपताच हे काम सुरू करण्यात येत आहे.

द्वारका चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याने शुक्रवारपासून अवजड वाहने, खासगी प्रवासी बस, एसटी आणि सिटीलिंक बसेसना पुढील तीन महिने प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिकरोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने सकाळी १० ते रात्री आठ या कालावधीत सिन्नर फाटा, दत्त मंदिर सिग्नल, फेम सिग्नलकडून रविशंकर मार्गे गरवारे पॉईंटमार्गे जातील. सिन्नरकडे जाण्यासाठी पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव चौकातून कलानगर सिग्नल, वडाळा गाव चौक, रविशंकर मार्गाने फेम सिग्नलकडून पुणे रस्त्याने सिन्नरकडे जाता येईल.

पुण्याकडून नाशिक, त्र्यंबकेश्वरकडे येण्यासाठी एसटी बस सिन्नर फाटा, सम्राट सिग्नल, डीजीपीनगर रस्त्याने वडाळा गाव, कलानगर सिग्नल, लेखानगर, इंदिरानगर बोगद्याकडून वळून उंटवाडी, भवानी चौक, जलतरण तलावमार्गे ठक्कर बाजार (मेळा स्थानक) येथे येतील. शहरातून सिन्नर,पुण्याकडे जाण्यासाठी एसटी बस मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका चौक, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, साईनाथनगर सिग्नल, रविशंकर मार्गाने फेम सिग्नलमार्गे जातील. मुंबईकडून नाशिकमार्गे धुळ्याकडे ये-जा करणाऱ्या बस; तसेच पुण्याहून धुळे, मालेगाव, गुजरात, पेठ, दिंडोरीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या बसेस आणि निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेससाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

‘सिटीलिंक’च्या मार्गातही बदल

सिटीलिंक बसचा शालिमार ते नाशिकरोड दरम्यानचा मार्ग आता खडकाळी सिग्नल, सारडा चौक, उर्दू हायस्कूलकडून मदिना चौक, वडाळा नाका, नागरी सिग्नल, अशोका सिग्नल, फेम सिग्नल असा असेल. निमाणी स्थानकावरून सुटणाऱ्या सिटीलिंक बसेस तपोवनातील आगारातून सुटतील. हलक्या वाहनधारकांनाही पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. ३० जानेवारी ते २९ एप्रिल या कालावधीत वाहतुकीचे हे निर्बंध लागू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) संदीप मिटके यांनी म्हटले आहे.