नाशिक – शैक्षणिक विश्वात दहावी-बारावीच्या परीक्षेस विशेष महत्व आहे. या परीक्षेच्या निकालावर पुढील करिअरची दिशा स्पष्ट होते, असे मानले जाते. सध्या परीक्षा केंद्रावर दहावी-बारावी परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू होण्याआधी तसेच नंतर परीक्षा केंद्रावर पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा खासगी शिकवणीवर्ग चालकांकडून घेतला जात आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी आणि पालकांसमोर परीक्षेनंतर पुढे काय, यासाठी विविध पर्याय खुले करून देण्यात येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे.

काही वर्षांपासून आठवीपासूनच एखाद्या खासगी शिकवणी वर्गाशी पालक करार करीत आहेत. या माध्यमातून मुले आपल्या दैनंदिन अभ्यासाबरोबरच दहावीनंतर देण्यात येणाऱ्या जेईई- नीट आदी परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. जेणेकरून दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेता येईल. काही पालक पारंपरिक मार्गाने दहावी परीक्षेनंतर येणाऱ्या निकालावर पुढे काय, याचे उत्तर शोधायचे यावर ठाम असतात.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी येणाऱ्या पालकांसमोर दहावीनंतर मुलांना काय करायचे, याविषयी केंद्राबाहेरच खासगी शिकवणीवर्ग चालकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी पत्रकांचा वापर करण्यात येत आहे. भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाण-घेवाण होते. तसेच ज्या खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थी शिकत आहे, त्यांच्याकडूनही पालकांचे संपर्क क्रमांक देण्यात येत आहेत. यामुळे सद्यस्थितीत बहुसंख्य परीक्षा केंद्रांबाहेर पालकांशी खासगी शिकवणी वर्गातील कर्मचाऱ्यांचा वेढा पडलेला दिसतो. याचा पालक आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. पालकांनी जाहिरातबाजीला भुलत विद्यार्थ्यांचा कल लक्षात न घेता एखादा निर्णय घेतल्यास जाहिरातबाजीचा फटका मुलांच्या भविष्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासगी शिकवणी वर्गाकडून जाहिरातीचा होणारा मारा, देण्यात येणाऱ्या सवलती यामुळे पालकांकडूनही विद्यार्थ्यांमागे अमूकच शिकवणीर्वगासाठी तगादा लावला जात आहे. याविषयी समुपदेशक किरण बावा यांनी माहिती दिली. परीक्षा केंद्राबाहेर वितरीत होणाऱ्या जाहिराती या विपणनाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी अशा कुठल्याही भुलथापा, जाहिरातींना बळी न पडता संपूर्णत: अभ्यास तसेच परीक्षेवर लक्ष केंद्रीत करावे. तसेच पालकांनी पुढे काय, याचे उत्तर तुर्तास बाजुला ठेवत मुलांच्या आरोग्य तसेच आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुढे काय, याचे उत्तर या गर्दीत नाही तर तुम्ही अवांतर माहिती मिळवा, मुलांचा कल लक्षात घ्या, त्याविषयी पाल्याशी चर्चा करा. यानंतर पुढील निर्णय घ्या असे बावा यांनी नमूद केले.

इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणी गाठण्याच्या आत आपल्याकडे वळविण्याची खासगी शिकवणीवर्ग चालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातूनच सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असतानाच खासगी शिकवणीवर्ग चालक थेट परीक्षा केंद्राबाहेर जाऊन पालकांना आपला वर्ग किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सध्या दहावी, बारावी परीक्षा सुरू आहे. कॉर्पोरेट खासगी शिकवणीवर्ग चालक हे दहावीचे खासगी शिकवणी वर्गचालक, इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्याकडून विद्यार्थ्यांचा खासगी तपशील मिळवत आहेत. अकरावीसाठी संलग्नतेचा (टायअप) करार समोर ठेवत आहेत. वास्तविक पालकांनी मुलांना आपण दुसऱ्यांदा शिकण्याची संधी नाकारत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. या अशा जाहिरात, विपणनाच्या माध्यमातून जास्तीजास्त विद्यार्थी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. खासगी शिकवर्णी वर्ग संघटनेचा याला विरोध आहे. मात्र शासन याबाबत कुठलीही ठोस भूमिका जाहीर करीत नाही, याची खंत आहे. – जयंत मुळे (संचालक, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटना)