नाशिक – नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डाची नागरिकांना अनेक ठिकाणी मदत होणार आहे. तसेच, महसूल विभागामार्फत ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ ही संकल्पना राबविण्यात येत असून, नागरिकांना जिल्ह्यात कुठेही आपल्या मालमत्ता नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
नाशिक तहसील व अपर तहसील कार्यालयातर्फे आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. एक जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अशा नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत व कायदेशीर पुरावा मिळणार आहे.
प्रॉपर्टी कार्डमुळे मालकी हक्क स्पष्ट होऊन बँक कर्ज, शासकीय योजना, तसेच विविध शासकीय प्रक्रियांसाठी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध होतील. तसेच दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून त्यांच्या मालमत्तांना कायदेशीर मान्यता मिळण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगामी काळात अशा प्रकारची शिबीरे राबविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श समोर ठेवून या शिबीरात आलेला प्रत्येक लाभार्थी समाधानी चेहऱ्याने गेला पाहिजे, हीच शिबिरांच्या आयोजनामागील शासनाची प्रमुख भूमिका आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांना एक हक्काचे व्यासपीठ या माध्यामातून उपलब्ध झाले आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्रात जवळपास २ लाख ९० हजार लाभार्थ्याना विविध लाभ प्रदान केले गेले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात १२ हजार २५९ नागरिकांना याचा लाभ झाला आहे. शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी शासनाने ४८ निर्णय घेतले आहेत. महसूल विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंधास मंजूरी घेण्यात आली असून जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार प्रदान केल्यामुळे नागरिकांना १५ दिवसांत शेत मोजणी करून मिळणार असल्याचे मंत्री . बावनकुळे यांनी सांगितले.
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व, आधिवास प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी दाखले, संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभ, ई शिधापत्रिका, रेशनकार्ड, तुकडेबंदी तुकडे जोड अशा विविध लाभांचे प्रदान प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. आभार मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर यांनी मानले.
